लॉकडाऊनची आर्थिक झळ बसल्याने तरुण व्यापार्‍याचे श्रीरामपुरात उपोषण

लॉकडाऊनची आर्थिक झळ बसल्याने तरुण व्यापार्‍याचे श्रीरामपुरात उपोषण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना महामारीमुळे गेल्या वर्षी फेब्रुवारी ते जुलैपर्यंत, तर यावर्षीही महिनाभरापासून सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आला. या कालावधीत व्यवसाय बंद राहिल्याने व्यापार्‍यांना आर्थिक झळ बसली आहे. मालही पडून खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने विविध करांमध्ये, बँकेकडील कर्जाच्या व्याजात व वीज बिलात सवलत द्यावी, या मागणीसाठी येथील व्यापारी तथा स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अमित मुथा यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे.

व्यापार्‍यांची परिस्थिती हलाखीची झाली असून काही व्यापार्‍यांनी आत्महत्यादेखील केली आहे. सरकारने कडक लॉकडाऊन केल्याने व्यापार्‍यांचे व्यापार बंद असून उत्पन्नाचे साधन बंद आहे. मात्र घरखर्च व इतर दवाखान्याचा खर्चही चालू असल्याने व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे सरकारने वीज बील, बँक व्याज, पालिका विविध कर सवलती बाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मुथा यांनी यावेळी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदनही दिले आहे. या मागणीसाठी त्यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले असून यापुढे व्यापार्‍यांनी हलाखीच्या परिस्थितीमुळे आत्महत्या केली तर त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com