लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील दूध धंद्याला फटका!

दूध उत्पादन घटले, भावही पडले, दूध उत्पादकांवर आर्थिक अरिष्ट
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील दूध धंद्याला फटका!

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या लॉकडाऊनमुळे नगर जिल्ह्यातील दूध उत्पादन घटले आहे. निव्वळ दूध संघ अथवा डेअर्‍यांकडून संकलित होणारे दूध संकलन 32 लाख लिटरवरून 27 लाख लिटर वर आले आहे.

शेतीला पुरक व्यवसाय म्हणून नगर जिल्ह्यातील 80 टक्के शेतकरी शेतीला जोडून दुग्धव्यवसाय करतात. काहींना शेती नाही पण दुग्ध व्यवसायात असलेल्यांची संख्याही बर्‍यापैकी आहे. दर दहा दिवसाला दुधाचे पेमेंट मिळत असल्याने अनेकांची आर्थिक नाडी दुग्ध व्यावसाय हाच आहे. दुग्धउत्पादकांना दुधाच्या व्यावसायातून स्थैर्य प्राप्त झाले आहे. शेतीचे कोणतेही पीक घेतले तर त्याचे लगेच पैसे मिळत नाहीत. उसासारखे नगदी पिकही उशिराने पैसे देणारे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा आठवडा बाजार, तसेच इतर दैनंदिन खर्च भागविणारा हा दूध धंदा आहे. हरित आणि श्वेतक्रांती नंतर या दूध धंद्याला देशभरात चांगले दिवस आले.

नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दूध धंद्याने मोठा आधार दिला आहे. पूर्वी सहकारी संस्थांच्या मार्फत दूध संकलन होत होते. आताही त्या आहेत परंतु त्यांना खाजगी दूध संकलन केंद्र, प्लँट यांचे आव्हान आहे. किंबहूना खाजगी दूध संंकलन मोठ्या प्रमाणात होत आहे. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन होण्या आगोदर 32 लाख लिटर दूध संकलन होते. त्यात घट झाली आहे. यावर्षी दुधाचे संकलन 27 ते 28 लाख लिटरपर्यंत खाली आले आहे. चहाची दुकाने, स्विट होम यांनाही दैनंदिन दूध लागते.

मात्र करोनाच्या लॉकडाऊनमुळे दूध उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन असल्याने काही काम नसल्याने जनावरांच्या अतिरिक्त खुराकवर त्याचा परिणाम झाला. महागडी खाद्य घेणे शेतकर्‍यांना परवडत नाही. परिणामी दूध उत्पादन घटले आहे. त्यातच दुधाचे दर 32-33 रुपयांवरून 22 ते 23 रुपये इतके खाली आहेत. सरासरी लिटरमागे 10 रुपये शेतकर्‍यांना कमी मिळत आहेत. त्याचा फटकाही दूध उत्पादनावर झाला आहे. शासनाचे या दरावर नियंत्रण नाही. शासन आरोग्य यंत्रणेत जास्त गुंतले आहे. त्यातच दूध पावडरचे दर, बटरचे दर कमी झाले आहेत. लॉकडाऊनमुळे चहाची दुकाने बंद आहेत. चहाची साधी टपरी जरी असली तरी तो 50 ते 100 लिटर दूध घेतो. मात्र तेही बंद आहेत. स्विट होम, बंद आहेत. उपपदार्थ विक्री 20 टक्क्यांवर आली आहे. याचे दूरगामी परिणाम दुग्ध व्यवसायावर झाले आहेत.

लॉकडाऊनमुळे सरकारने दूग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. ग्राहक कमी झाले. मोठी मोठी शहरे पुर्णत: लॉकडाऊनमध्ये आहेत. त्यामुळे खरेदीदाराच्या संख्येवर परिणाम झाला आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर वगळता अन्यत्र कुठेही दुधापासून पावडर बनविण्याचा कारखाना नाही. परिणामी दुधाला फारसा उठाव नाही. उन्हाळ्यात लस्सी, ताक यासारख्या दूग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. परंतु यावर्षी विक्री घटली आहे. फ्लेवर्ड दुधाची विक्री ही घटली आहे. लग्न समारंभ बंद असल्याने पर्यायाने लग्नातील विविध खाद्य पदार्थांची निर्मिती बंद आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी, शनिशिंगणापूर व अन्य देवस्थाने लॉकडाऊनमध्ये बंद आहेत. त्यामुळे पेढे विक्री होत नाही. याचा मोठा फटका दूग्ध व्यवसायाला बसला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com