करोना लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा

समाजवादी पार्टीची निवेदनाद्वारे मागणी
करोना लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना काळात सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हातचे काम गेले. आर्थिक फरफट झाल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आला. त्यात महावितरणने अव्वाच्या सव्वा बिले पाठवून दुहेरी संकटात टाकले. त्यात महावितरण ग्राहकांकडून सक्तीने वीजबिल वसुली करत आहे. अन्यथा वीज तोडण्याची धमकी दिली जात आहे. महावितरणकडून होत असलेल्या सक्तीच्या वीजबील वसुली विरुद्ध समाजवादी पार्टीतर्फे महावितरण अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

सध्या करोना संकटाने भरडला जात असलेला सर्वसामान्य नागरिक वीज बिलाद्वारे संतप्त होत असून आस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटाचा सामना करत अक्षरशः मेटाकुटीला आला आहे, सक्तीची वीजबील वसुलीच्या फर्मानमुळे नागरिकांच्या संकटात आणखी भर पडून मोठ्या संतापाचा सामना करणे त्यांना भाग पडत आहे. दोन महिने सर्वसामान्यांच्या हाताला काम नव्हते. विजेची बिले भरा अन्यथा वीज कनेक्शन बंद करतो अशी धमकी दिली जात आहे.

शासनाच्यावतीने काही तरी सहानुभुतीपूर्वक सवलतीच्या माध्यमातून अर्धे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेणे गरजेचे होते. मात्र सहानुभुती ऐवजी जर राज्यशासनाकडून नागरिकांना त्रास देण्याची भूमिका स्विकारली जात असेल तर समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या या कारभाराविरुद्ध तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणे भाग पडेल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे,

यावेळी समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, शहराध्यक्ष समीर शेख, अब्दुल सैय्यद, इरफान पठाण, जकरिया सैय्यद, परवेज शेख, जब्बार भाई पठाण,जलील शेख, शाहिद शेख, युनूस पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com