
राहाता |वार्ताहर| Rahata
लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात हॉटेल व्यवसाय बंद झाले परिणामी दुधाची मागणी घटली. दुधाचे दर 32 रुपयांवरून 22 रु झाल्यामुळे ग्रामीण भागात शेतीला जोड व्यवसाय म्हणून पूरक समजला जाणारा दूध व्यवसाय अडचणीत आला. त्यामुळे हा व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सरकाराने दूध व्यवसायला अनुदान द्यावे अशी मागणी दूध उत्पादकांकडून होत आहे.
करोना महामारी मुळे दोन वर्षापासून देशात लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली. सर्व हॉटेल व्यवसाय बंद झाल्याने दुधाला मागणी राहिली नाही. या परिस्थितीमुळे दूध धंद्यावर अवकळा आली. दूध दर 10 रुपय प्रति लिटर कमी झाले; परंतु खाद्य व जनावरांचा चारा याचे भाव कमी न होता ते गगनाला भिडले. दूध व्यवसायाचा तेरीज ताळेबंद जुळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. सरकारने सरसकट सर्व दूध व्यावसायिकांना पाच रुपये अनुदान जाहीर करावे व 26 ते 27 रु.हमी भावाप्रमाणे दुधाला भाव दिला तरच दूध व्यवसाय टिकू शकेल.
दूध हे दैनंदिन आहारात महत्त्वपूर्ण घटक आहे. ग्रामीण भागात 80 टक्के शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु दूध व्यवसाय अडचणीत आल्यामुळे शेतकर्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. लॉकडाऊन परिस्थितीमुळे शेतीमालाची वाताहात झाली. मागील महिन्यात 32 रुपये लिटर प्रमाणे विक्री होणारे दूध आता 22 रुपये प्रमाणे विकावे लागते. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
मागील महिन्यात दुधाची दरवाढ झाल्याची परिस्थिती पाहता जनावरांचे खाद्य पुरवठा दर मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे. पशुखाद्यामध्ये सोयाबीन, शेंगदाणा, सरकी, पेंड, याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने जनावरांचा सांभाळ करावा की, क़रोना संकटाचा सामना करावा, अशी दुहेरी परिस्थिती शेतकर्यांपुढे उभी राहिली आहे. मागील महिन्यात 1 हजार 250 रुपये सरकी पेंडीचे खाद्याचे पोते होते ते आता 1 हजार 650 रुपये झाले आहे.
दूध व्यवसाय सुरळीत होण्यासाठी जनावरांचे बाजार तात्काळ सुरू केले तरच दुधाचे दर स्थिर होतील. लॉकडाऊनमुळे बाजार समितीत जनावरांची खरेदी-विक्री व्यवहार बंद असताना अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने जनावरांचे खरेदी-विक्री व्यवहार होत असल्यामुळे शेतकर्यांची फसवणूक होते. तीच खरेदी-विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाली तर व्यवहार पारदर्शी होतील.
- उद्धव देवकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता.