लॉकडाऊन काळात कोपरगाव-राहात्यात 113 जणांची आत्महत्या
सार्वमत

लॉकडाऊन काळात कोपरगाव-राहात्यात 113 जणांची आत्महत्या

Arvind Arkhade

शिर्डी|Shirdi

करोनाच्या महामारीत खूप काही गमावले तसेच करोनात खूप काही शिकायलाही मिळाले. सधन व जागरूकता असणार्‍या तालुक्यांतही अनेक समस्या निर्माण झाल्या. या समस्या आपल्या आयुष्याला व पाचवीलाच पुजलेल्या राहतील की काय अशी धास्ती घेत अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली, अर्थात लॉकडाऊन करून टाकली. गोदावरीच्या तिराकाठी भौगोलिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कोपरगाव आणि राहाता तालुक्यात लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत 113 व्यक्तींनी आत्महत्या केल्या असून त्यामध्ये पुरुषांची संख्या 78 तर महिलांची संख्या 35 आहे.

सधन तालुक्यातील युवकांनी आत्महत्या करण्याऐवजी समाजात एक आदर्श जीवन जगून नव्या पिढीला संदेश द्यावा असे आवाहन शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी केले असून संकट कितीही येऊ द्या लढा देण्यास आम्ही तयार आहोत हे सिद्ध करून दाखवणे हीच खरी काळाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोदावरीच्या तीरावर वसलेल्या तसेच निसर्गाने नटलेल्या राहाता कोपरगाव तालुक्यात लॉकडाऊन काळात 113 जणांनी आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामध्ये 24 जणांनी फाशी घेतली आहे तर 13 जणांनी पाण्यात उडी मारून तसेच अन्यप्रकारे 76 जणांनी आत्महत्या केल्या असून ही युवा पिढीच्यादृष्टीने मोठी चिंताजनक बाब आहे.

आर्थिक विवंचना, कौटुंबिक चिंता, शेतमालाला भाव नाही, हाताला काम नाही, करोनाने नोकरीवर येणारी गदा, व्यापारावर आलेले संकट, बँका, फायनान्स कंपन्या यांचा डोईजड होत चाललेला आर्थिक बोजा अशा अनेक प्रकारच्या चिंतांमुळे मानसिक स्वास्थ्य दररोज हरपून जात आहे. स्वास्थ्याच्या बाबतीत कमजोर होतानाच करोना महामारी संपुष्टात येत येण्याचे नाव घेत नसल्याने भविष्याचे संकट अधिक गडद होईल ही धास्ती अनेकांना झोप येऊ देत नाही.

मानसिक दडपण अथवा भीती निर्माण होणे हा एक दैनंदिन जीवनाचा भाग झाला मात्र त्याला घाबरून आपण आपले जीवन संपवणे अथवा गळफास घेणे हे त्या प्रश्नावरील उत्तर नसून आपल्याला आपल्यासाठी जगताना आपल्या परिवारासाठी, नातेवाईकांसाठी जगणे महत्त्वाचे आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com