कर्जमाफीच्या यादीत नाव नसलेले शेतकरी पीक कर्जापासून वंचित

कर्जमाफीच्या यादीत नाव नसलेले शेतकरी पीक कर्जापासून वंचित

पुणतांबा|वार्ताहर|Puntamba

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंर्तगत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन लाखापर्यंत पीककर्ज असणार्‍या शेतकर्‍यांचे सरसकट कर्जमाफ केल्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुध्दा केलेली आहे. त्याचा लाभ राहाता तालुक्यातील पुणतांबा गावातील काही शेतकर्‍यांना मिळाला आहे. मात्र कर्जमाफीच्या निकषानुसार पात्र असणार्‍या अनेक शेतकर्‍यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही. ते पात्र की अपात्र याबाबत शासनाकडून कोणतीही स्पष्ट सूचना नसल्यामुळे अशा शेतकरी वर्गाची कोंडी झाली असून त्यांना चालू खरीप हंगामासाठी पिककर्ज मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

राहाता तालुक्यात 73 सेवा संस्था असून त्यांचे अंदाजे 956 3 सभासद आहेत त्यापैकी 8165 सभासदांना 5 3 कोटी 27 लाखाची कर्जमाफी मिळाली आहे. अजून 1398 सभासद कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहे. यामध्ये तांत्रिक कारणामुळे ज्यांनी नावे प्रलंबित आहेत त्यात दुरुस्ती करून त्यांचा समावेश कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे राहाता येथील जिल्हा बँकेच्या तालुका विकास अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने त्यांच्या कर्जमाफीची हमी घेतली तर त्यांना पिककर्ज मिळणार आहे. मात्र त्यातील शासनाच्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आलेल्या शेतकर्‍यांची संख्या 535 असून या शेतकर्‍यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही व नवीन कर्ज घेतांना त्यांना अडचणी येत आहे हे शेतकरी कर्जमाफीच्या निकषात बसतात मात्र शासनाच्या यादीत नाव नसल्यामुळे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे ज्या शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली नाही, अशा अंदाजे 11 लाख शेतकर्‍यांना 31 जुलैपर्यंत कर्जमाफी देण्याची नुकतीच घोषणा केली आहे मात्र याची अंमलबजावणी केव्हा होणार व कर्जमाफी मिळून नवीन पिककर्ज घेण्यास ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे, तोपर्यंत खरीप पिकांसाठी औषध फवारणी खते अंर्तगत मशागतीसाठी शेतकरी वर्गाला पैशाची उपलब्धता होणार नसून खरीप हंगामात नुकसान होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी राज्यसरकारने व जिल्हा सहकारी बँकांनी तोपर्यंत धोरणात्मक निर्णय घेऊन कर्जमाफीपासून वंचित राहणार्‍या शेतकर्‍यांना पिककर्जासाठी पर्यायी व्यवस्था करून देण्याची गरज आहे.पुणतांबा येथील पुणतांबा नं. 2 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमधील सभासद असलेल्या सौ. सुनिता बखळे तसेच भाऊसाहेब एकनाथ थोरात हे अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत गावातील इतर सोसायटीमधील काही सभासदांची नावेही आलेली नाहीत अशा अनेक सभासदांना पिककर्ज घेण्यात अडचणी येत आहे.

त्यामुळे अशा प्रलंबित प्रकरणाबाबत जिल्हा बँकांनी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे दरम्यान पिककर्जाबाबत निर्णय घेण्यासाठी सेवा संस्थाच्या सचिवांची आज राहाता येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती पुणतांबा नंबर. 2 चे सचिव काशिनाथ धनवटे यांनी सार्वमतशी बोलतांना दिली

Related Stories

No stories found.