अहमदनगर (प्रतिनिधी) -

शहर सहकारी बँक कर्ज फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेला आरोपी डॉ. निलेश शेळके याला पोलीस कोठडीत व्हीआयपी

व्यवस्था मिळत असल्याचा आरोप या गुन्ह्यातील फिर्यादी रोहिणी भास्कर सिनारे, उज्वला रवींद्र कवडे, विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी केला आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, निलेश शेळके विरोधात आम्ही फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश शेळके याला 26 डिसेंबरला अटक

करण्यात आली असून तो पोलीस कोठडीत आहे. निलेश शेळके याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2020 मध्ये फेटाळला आहे. त्याला सात दिवसामध्ये न्यायालयात हजर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. परंतू, तो फरार होता. रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याचा शोध घेताना निलेश शेळकेला पोलिसांनी अटक केली आहे. शेळके हा बोठे याचा मित्र असून तो त्यास मदत करीत असल्याचा संशय आहे. शेळके याला पोलीस कोठडीत व्हीआयपी सुविधा पुरविल्या जात असल्याची बाब कायद्याच्या दृष्टीने चुकीची आहे. तरी आपण त्याची नोंद घेऊन चौकशी करावी अशी मागणी फिर्यादी यांनी केली आहे.

शेळकेचे पोलिसांसोबत सलोख्याचे संबंध

निलेश शेळके याच्याविरूद्ध त्याची पत्नी सुजाता शेळके हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी शेळके याला सहकार्य करून पूर्ण सखोल तपास केला नव्हता. यावरून लक्षात येते की, शेळके याचे काही पोलीस अधिकार्यांशी सलोख्याचे संबंध आहे. शेळके याच्याकडील पैसा, राजकीय लागेबांधे व दडपशाहीचा वापर करून गुन्ह्यातील साक्षीदारांवर दडपण आणण्याची शक्यता आहे. तरी यामध्ये लक्ष घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी यांनी अधीक्षक पाटील यांच्याकडे केली आहे.