कर्ज वितरणात जिल्हा बँकेने ओलांडला एक हजार कोटींचा टप्पा

करोना संकटात शेतकर्‍यांना 1 हजार 172 कोटींची बुस्टर
कर्ज वितरणात जिल्हा बँकेने ओलांडला एक हजार कोटींचा टप्पा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या दुसर्‍या लाटेत जिल्ह्यात पुन्हा जवळपास दीड ते दोन महिन्यांचा लॉकडाऊन होता. याचा मोठा फटका जिल्ह्यातील अर्थ चक्राला बसला आहे. शहरी भागाप्रमाणे पहिल्यांदा ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजुराच्या हाताला काम नव्हते. कांदा, ऊस, या नगदी पिकांसोबत शेतकर्‍यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणार्‍या दूध व्यवसायाचे चित्र विचित्र होते.

अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी भांडवल उभे करून देण्यासाठी जिल्हा सहकारी बँक शेतकर्‍यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिली आहे. करोना काळातही जिल्हा बँकेने 66 टक्के वसुली करत नव्याने बळीराजाला 1 हजार 7 कोटी रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तर उर्वरित शासकीय, खासगी आणि अन्य बँकांनी शेतकर्‍यांना हंगामासाठी 156 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

मान्सून पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. तर मान्सून देखील उंबरठ्यावर उभा असल्याने जिल्ह्यात बळीराजाने खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. हंगामासाठी खते, बियाणे, किटक नाशकांसोबत शेतकर्‍यांना खेळते भांडवलाची गरज असते. करोनामुळे शहरी भागासह ग्रामीण भागाचे अर्थकारणाचा वेग मंदावला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना भांडवलासाठी कोण दारात उभे करत नसतांना दरवर्षी प्रमाणे यंदही करोना संकटाचा बाऊ न करता, उलट करोनातही शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात खरीप पिकासाठी कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 3 हजार 753 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यात जिल्हा बँक, सरकारी बँक, खासगी बँका आणि ग्रामीण बँकांना कर्जाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. मात्र, जिल्हा बँक वगळता अन्य बँका शेतकर्‍यांच्या कर्जाबाबत फारशा गंभीर नसल्याचेे चित्र आहे. ते करोना काळात कायम असल्याचे जिल्हा अग्रणीय बँकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 172 कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप झालेले असून यात एकट्या जिल्हा बँकेचा वाटा 1 हजार 7 कोटी आहे. उर्वरित सर्व बँकांनी अवघा 156 कोटी रुपयांचे अर्थसहाय शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेकडून सांगण्यात आले.

खरीप हंगामाच्या कर्ज वाटपचा कालावधी हा सप्टेंबर महिन्यांपर्यंत आहे. साधारण एप्रिल, मे पासून खरीपासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरूवात होते. मात्र, बागायत तालुक्यात प्रामुख्याने ऊस लागवडीसाठी कर्ज घेण्यात येते. ही लागवड उशीरा सुरू होत असल्याने सध्या ज्या तालुक्यात ऊसाचे क्षेत्र अधिक आहे, त्या ठिकाणी जिल्हा बँकेचे कर्ज सध्या कमी दिसत आहे. मात्र, पावसाच्या पाण्यावर पिके घेणार्‍या तालुक्यात सध्या जिल्हा बँकेच्या पतपुरवठ्याचा आकडा अधिक असल्याचे दिसत आहे.

तालुकानिहाय पतपुरवठा

अकाले 107, संगमनेर 121, श्रीरामपूर 13, नगर 143, जामखेड 77, कर्जत 82, कोपरगाव 18, नेवासा 23, शेवगाव 43, श्रीगोंदा 40, पारनेर 176, पाथर्डी 112, राहुरी 28, राहाता 13. (आकडे कोटींमध्ये)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com