Video : गीता हा युवा व लढवय्यांचा ग्रंथ!

सार्वमत-देशदूत वेब व्याख्यानमाला : डॉ.संजय मालपाणी यांनी गुंफले दुसरे पुष्प

अहमदनगर | Ahmednagar

गीता हा युवकांचा आणि लढवय्यांचा ग्रंथ आहे. गीता नावाची ही पोथी आपल्याला देवघरातून बाहेर काढून जीवनात आणली पाहिजे. जीवनात आचरण करावे असा हा ग्रंथ आहे, अशी मांडणी सुप्रसिद्ध गीता व्याख्याते डॉ.संजय मालपाणी यांनी ‘गीता’ या ग्रंथाचे महत्त्व उलगडून दाखवताना केली.

सार्वमत-देशदूत आयोजित वेब व्याख्यानमालेत मंगळवारी सुप्रसिद्ध शिक्षण व्याख्याते, विचारवंत, उद्योजक डॉ.मालपाणी यांनी ‘गीता समजून घेताना’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. डॉ.मालपाणी म्हणाले, भगवद् गीता ही जीवनात घोळवावी लागते. ही जीवनात घेळवावी लागते. केवळ एकदा वाचून कळत नाही. ती पुन्हा-पुन्हा वाचावी लागते. हा जीवनात आचरण्याचा ग्रंथ आहे. 2 वर्षाच्या कालखंडात गीतेवरील 75वर पुस्तके वाचली. तेव्हा लक्षात आलं की मानसशास्त्र असो की व्यवस्थापनशास्त्र अशा अंगांनी, 700 श्लोकांची गीता सरस आहे. समुपदेशनासाठी तर हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. गीता नावाची ही पोथी आपल्याला देवघरातून बाहेर काढून जीवनात आणली पाहिजे. कारण भगवद् गीता हे असे शास्त्र आहे जे रणांगणावर तरूण योद्धा अर्जूनाला सांगीतले गेले आहे.

हा युवकांचा आणि लढवय्यांचा ग्रंथ आहे. रणांगणावर गलीतगात्र झालेल्या अर्जूनाला सामर्थ्य देणारा हा ग्रंथ आहे. आपणही रोज युद्ध करत असतो. तुकाराम महाराज सांगून गेले आहेत की, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आंर्तबाह्य जग आणि मन’. आजही आपण बाहेर करोनाशी युद्ध करतोय आणि आत मनातही अनेक युद्ध सुरू असतात. अशा वेळी वेगळा दृष्टीकोन या ग्रंथातून मिळतो. संकटांना सामोरे कसे जायचे आणि आपली मन प्रफुल्लीत कसे राखायचे, याचे जर उत्तर शोधून काढायचे असेल तर त्यासाठी गीता हा ग्रंथ आहे. सर्व दुखांवर मात करण्याचे सूत्रही याच ग्रंथात आहे.

गीतेच्या अनेक उपदेशांचे विवेचन करत डॉ.मालपाणी यांनी आपले व्याख्यान फुलवले. प्रारंभी शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी त्यांचा परिचय करून दिला. 30 मेपर्यंत दररोज सायंकाळी 7 वाजता अभ्यासपूर्ण विषयांवरील वेब व्याख्यानमाला प्रसारित होणार आहे.

‘विनोबा’

आज बुधवार, 26 मे रोजी प्राचार्य डॉ. गणेश राऊत हे ‘विनोबा’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत. पुणे येथील देसाई महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख असलेले डॉ.राऊत हे विविध विषयांवरील दीड हजारांवर व्याख्यानांचे अनुभवसिद्ध व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. 9 पुस्तकांचे लेखन व 16 पुस्तकांचे संपादनासह हजारावर लेखांचे लेखन त्यांनी केले. त्यांचे व्याख्यान सायंकाळी 7 वाजता प्रसारित होईल.

30 मेपर्यंत दररोज सायंकाळी विविध वियषांवरील या व्याख्यांनांचा आनंद आपणास घेता येणार आहे. परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे, लेखक व शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, प्राचार्य डॉ. गणेश राऊत, संगीत चिकित्सक डॉ.संतोष बोराडे, शिक्षण अभ्यासक हेमांगी जोशी हे मान्यवर वक्ते या वेब-व्याख्यानमालेत पुढील विचारपुष्प गुंफणार आहेत.

वाचक-रसिकांसाठी या वेब-व्याख्यानमालेचे ऑनलाईन प्रक्षेपण www.deshdoot.com या संकेतस्थळासह युट्यूबचे deshdoot या चॅनलवर दररोज सायंकाळी 7 वाजता होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com