Video : निरीक्षण व परिक्षणातून नाट्य फुलवा

धमाल बालमस्तीचा समारोप : प्रकाश पारखींनी दिले नाट्यधडे
Video : निरीक्षण व परिक्षणातून नाट्य फुलवा

अहमदनगर (प्रतिनिधी)-

‘सार्वमत-देशदूत’ समूहातर्फे विद्यार्थी मित्रांसाठी आयोजित ‘धमाल बालमस्ती’ या ऑनलाईन कार्यशाळेत बुधवारी अखिल भारतीय नाट्य परिषद संलग्न बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पारखी यांनी ‘नाट्यरंग’ या सत्रातून विद्यार्थीमित्रांना धमाल अभिनय धडे दिले. सभोवतालाचे निरीक्षण व परिक्षणातून नाट्य फुलवा, असा संदेश त्यांनी बालमित्रांना दिला. दरम्यान, 10 जून रोजी प्रारंभ झालेल्या 7 दिवसांच्या ऑनलाईन कार्यशाळेचा या सत्रासोबत समारोप झाला.

श्री.पारखी हे नाट्यसंस्कार कला अकादमीचे संस्थापक व प्रमुख विश्वस्त आहेत. 43 वर्षापासून बालरंगभूमी चळवळीत सक्रीय आहेत. त्यांच्या ‘नकला नगरी’ या एकपात्री कार्यक्रमाचे 1965 पासून देश-विदेशात हजारो प्रयोग झाले आहेत. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, योगेश सोमण, अथर्व कर्वे हे सुप्रसिद्ध सिने-नाट्य कलावंतांना अभिनयाचे धडे देणारे श्री.पारखी यांनी गाणे, आवाज आणि अभिनयाच्या तंत्राची ओळख करून दिली.

आपल्या जीवनातील प्रत्येक घडामोडीत नाट्य आणि अभिनय आहे. त्याचे निरीक्षण केले पाहिजे. आपल्या रोजच्या आयुष्यातही आपण अभिनय करतच असतो. त्याचे स्वत:च परिक्षण केले पाहिजे. आवाजातील चढ उतार, एखादी ओळीचा उच्चारामुळे बदलणारा अर्थ, स्वरांवरील नियंत्रण, अभिनयाचा सराव, अभिनयात नृत्यामुळे मिळणारी गती, वाचनातून प्रगल्भ होणार्‍या प्रतिमा अशा अनेक विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी अभिनयासह सादर केलेली गाणी आणि संवादाला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. प्रारंभी शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी त्यांचा परिचय करून दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com