पुष्प पहिले : विनोदामुळे मराठी विश्व समृद्ध!

सार्वमत-देशदूत वेब व्याख्यानमाला | पद्मश्री पवारांकडून उपक्रमाचे कौतुक

अहमदनगर (प्रतिनिधी)

विनोदाकडे पाहण्याची दृष्टी आवश्यक आहे. हाच विनोद आपल्याला जगण्याची कला शिकवतो. शब्दसमृद्ध विनोदामुळे मराठी भाषा समृद्ध झाली, अशी मांडणी लेखक, साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांनी सार्वमत-देशदूत ऑनलाईन वेब व्याख्यानमालेने पहिले पुष्प गुंफतांना केली. दरम्यान, हा उपक्रम म्हणजे निराशेचे मळभ दूर करण्यासाठीचा उत्तम प्रयत्न असल्याचे मत आदर्श गाव संकल्पनेचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

सार्वमत-देशदूत आयोजित वेब व्याख्यानमालेला सोमवारी प्रारंभ झाला. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन पद्धतीने आयोजित या उपक्रमाने रसिक-श्रोत्यांना घरबसल्या वैचारिक मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. उद्घाटन करताना पद्मश्री पवार म्हणाले, निराशेच्या काळात हा कार्यक्रम नक्कीच आशा निर्माण करणारा आहे. या उपक्रमामुळे ‘सार्वमत’ने आपली सामान्य वाचकांशी असलेली बांधीलकी जोपासली. सार्वमत-देशदूत समूहाचे अध्यक्ष विक्रमभाऊ सारडा यांंनी सहभागी मान्यवरांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे वक्ते डॉ.कळमकर यांनी मराठी विश्वातील राजकारण, शिक्षण आणि साहित्यिकांचे दाखले देत व्याख्यान फुलविले. ते म्हणाले, मराठी भाषेने विनोदाला दुय्यम स्थान दिले. मात्र विनोदाने मराठी भाषा समृद्ध केली आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी दिली. ते काम आजही सुरू आहे. विनोद हा देखिल गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे. विनोदी साहित्यिक हा आधी प्रतिभासंपन्न साहित्यिक असावा लागतो, तरच विनोदाची दृष्टी विकसीत होते. यावेळी त्यांनी विविध दाखले देत आपल्या नर्मविनोदी मांडणीतून आनंदाची पेरणी केली.

प्रारंभी सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी उपक्रमाविषयी भूमिका मांडली तर शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी सुत्रसंचालन केेले.30 मेपर्यंत दररोज सायंकाळी 7 वाजता अभ्यासू वक्ते या वेब व्याख्यानमालेतून विषयमांडणी करणार आहेत.

गीता समजावून घेताना

मंगळवार, 25 मे रोजी सुप्रसिद्ध शिक्षण व्याख्याते, विचारवंत, उद्योजक डॉ.संजय मालपाणी ‘गीता समजून घेताना’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. सामाजिक, शिक्षण व उद्योग विश्वाला त्यांनी आपल्या कार्याने नवे आयाम दिले. 66 पुस्तकांचे लेखन व संपादन त्यांनी केले आहे. गीता परिवाराच्या माध्यमातून संस्कार व संस्कृती प्रसारासाठी कार्यरत असलेले डॉ.मालपाणी विविध शिक्षण संस्थांचे संस्थापक व संचालक आहेत.

पुढील विचारपुष्प

परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे, लेखक व शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, प्राचार्य डॉ. गणेश राऊत, संगीत चिकित्सक डॉ.संतोष बोराडे, शिक्षण अभ्यासक हेमांगी जोशी हे मान्यवर वक्ते या वेब-व्याख्यानमालेत पुढील विचारपुष्प गुंफणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com