गायीच्या धाडसी प्रतिकाराने बिबट्याचे पलायन
सार्वमत

गायीच्या धाडसी प्रतिकाराने बिबट्याचे पलायन

मामा-मामीने भाच्याला वाचवलेल्या महालक्ष्मी हिवरेतील दुसरा थरार

Arvind Arkhade

चांदा|वार्ताहर|Chanda

3 जुलै रोजी महालक्ष्मी हिवरे येथे 11 वर्षीय मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून मामा-मामीचे धाडस व समयसुचकतेमुळे वाचला. ही घटना ताजी असतानाच बिबट्याने एका गाय व वासरावर हल्ला केला. तर शेजारीच असलेल्या दुसर्‍या गायीने बिबट्यावर हल्ला करुन तीव्र प्रतिकार केल्याने बिबट्यावर पलायन करण्याची वेळ आली. बिबट्यामुळे या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत माहिती अशी की नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील बिबट्याचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेईना. गुरुवारी रात्री एक गाय व वासरावर बिबट्याने हल्ला चढवला तर शेजारीच बांधलेल्या दुसर्‍या गाईने बिबट्यावर हल्ला चढवून त्याला पिटाळून लावले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की महालक्ष्मी हिवरा येथील गट नंबर 71 मध्ये राहणारे सुभाष दिगंबर बोरुडे यांच्या वस्तीवर गाईच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या वासरू व गाईवर गुरुवारी रात्री दोन ते तीन वाजेदरम्यान बिबट्याने हल्ला चढवला. मात्र याच गोठ्यात असलेल्या दुसर्‍या गाईने खुंटीचा दोर तोडून थेट बिबट्यावरच हल्ला चढवला गाईचे रौद्ररूप पाहून बिबट्याला आपला जीव वाचविण्यासाठी पळ काढावा लागला.

बिबट्याच्या हल्ल्याने जखमी झालेल्या गाईचा हंबरडा ऐकून सुभाष बोरुडे व त्यांच्या वस्तीवरील सर्वजण घरातून बाहेर आले. त्यावेळी आपली सखी आणि तिच्या वासराला वाचविण्यासाठी गाय बिबट्याला पिटाळून लावत असल्याचे दृष्य दिसले. सर्वांनी आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून पळाला.

बिबट्याच्या दहशतीमुळे शेतावर काम करण्यासाठी देखील मजूर धजावत नाहीत. वनविभागाने तातडीने या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com