खोसपुरीला बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; चार शेळ्या फस्त

खोसपुरीला बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; चार शेळ्या फस्त
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

अहमदनगर (वार्ताहर) - नगर तालुक्यातील खोसपुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. चार शेळ्यांचा फडशा पाडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खोसपुरी गाव इमामपूर घाटातील गर्भगिरी डोंगररांगाच्या पायथ्याशी आहे. येथील शेतकरी भरत गेणुजी देवकर (वय-50) रविवारी (दि.28 जून) जनावरे चारण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी गेले होते. त्याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या चार शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत झाल्याचे जखमी देवकर यांनी सांगितले.

बिबट्याचा खोसपुरी शिवारात मुक्तसंचार असून वस्त्यांवरील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही या परिसरात बिबट्याचे वास्तव्य दिसून आलेले आहे. खोसपुरीचे सरपंच सोमनाथ हारेर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय भिसे व चेअरमन भीमराज आव्हाड यांनी देवकर कुटुबाची भेट घेत त्यांना आर्थिक देण्याची मागणी केली आहे.

वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक एस. एम. जगताप, पी. एस. उबाळे, वनकर्मचारी एस. एल. सरोदे, संजय पालवे यांनी खोसपुरी शिवारात पिंजरा लावला आहे. तसेच जखमी शेतकर्‍याची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. खोसपुरी शिवारात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात काम करण्यास घाबरतात. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आसाराम वाघमोडे, सुनील भालेराव, ग्रामपंचायत सदस्य संजय वाघमोडे, विकी खेमनर आदींनी केली आहे.

खोसपुरी शिवारातील नागरिकांनी बिबट्यांपासून संरक्षणासाठी योग्य काळजी घ्यावी. बिबट्याचा संचार दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क करावा. वनविभागाच्या वतीने पिंजरा लावलेला आहे.

- शैलेश बडदे, वनपाल

करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने बहुतेक लहान मुले जनावरे चारण्यासाठी डोंगर परिसरात जातात. पालकांनी लहान मुलांना जनावरे राखण्यासाठी पाठवू नये.

- सोमनाथ हारेर, सरपंच

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com