नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी सराला रस्त्यावर दि. 20 रोजी सांयकाळी 6.30 च्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घराकडे परतत असताना

सराला येथील तरुणाच्या मोटारसायकलवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण बचावला असून त्याच्या हाताला आणि पाठीला बिबट्याने दात लावल्याने तो जखमी झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील सराला येथील विजय नारायण विटेकर (वय 27) हा तरुण मोटारसायकलवरून जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झेप घेतली. या हल्ल्यात मात्र सुदैवाने तो बचावला असून त्याच्या हाताला व पाठीला बिबट्याचे दात लागल्याने श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास घरी सोडण्यात आले.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सराला - गोवर्धन ,निमगाव खैरी, जाफराबाद, नाऊर शिंदे वस्ती आदी भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून मागील महिन्यात गोवर्धन येथील शेतकरी सोमनाथ जगताप यांच्या कालवडीचा बळी घेतला होता, तर आता माणसांवर देखील हल्ला झाला असल्यामुळे या भागातील शेतकरी व शेतमजूर धास्तावला असून मजूर मिळत नसल्यामुळे कांदा लागवड, व इतर मशागत कशी करायची असा सवाल उपस्थित होत असून त्यात शेतीसाठी रात्रीचे पाणी असल्याने पाणी भरणे बिबट्याच्या धाकाने भितीचे ठरत आहे.

या बिबट्याला त्वरीत जेरबंद करावे अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा माळेवाडीचे सरपंच सोपानराव औताडे यांच्यासह सोमनाथ औताडे, माऊली वेताळ, शिवाजी विटेकर, पद्मनाथ वाघमारे, दादासाहेब जगताप आदीसह नागरिकांनी दिला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे बी.एस. गाडे, श्री. लांडे आदींनी पंचनामा केला.