भक्ष्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्यास 
बाहेर काढण्यास वन अधिकार्‍यांना यश

भक्ष्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्यास बाहेर काढण्यास वन अधिकार्‍यांना यश

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - शेळीवर झडप घालून तिला उचलून नेत असताना शेळीसह बिबट्या विहिरीत पडला. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी रात्री दीड वाजता बिबट्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. बेलापूर खुर्द येथील शेतकरी रमेश निवृत्ती भगत यांच्या वस्तीवर काल रात्री ही घटना घडली.

रमेश निवृत्ती भगत यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने झडप घालून शेळीला उचलून नेण्याच्या प्रयत्न केला. या नादात विहिरीचा अंदाज न आल्याने शेळीसह बिबट्या विहीरीत पडला. भगत व त्यांच्या कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे आसपासचे लोक जमा झाले. रात्रीच्या अंधारात विहिरीत बाज सोडून शेळीला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आले.

कोपरगावचे वनपाल भाऊसाहेब गाढे, विकास पवार, गोरख सुरासे, सूर्यकांत लांडे हे रात्रीच घटनास्थळी पोहोचले. सकाळी बिबट्याला बाहेर काढताना गर्दी जमा होण्याची शक्यता असल्याने त्यांनी रात्रीच बिबट्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. रात्री एक वाजता त्यांनी विहिरीत बाज सोडली. बाजेवर बिबट्या बसल्यानंतर काही वेळाने पिंजरा सोडून बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करण्यात आले. त्यानंतर त्याला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com