बिबट्याने मध्यवस्तीत घुसून शेळीचा पाडला फडशा, नागरिक भयभित

बिबट्याने मध्यवस्तीत घुसून शेळीचा पाडला फडशा, नागरिक भयभित

आंबी (वार्ताहर)-

राहुरी तालुक्यातील अंमळनेर येथील पाळंदे वस्तीवरील पोपट सखाराम पाळंदे या शेतकऱ्यांची शेळी बिबट्याने झडप घालून ठार केल्याची घटना घडली. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाढी येथे पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

शनिवारी दुपारनंतर आंबी-अंमळनेर परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रात्रभर वीज गायब होती. बिबट्याने अंधाराचा फायदा घेत मध्यरात्री पाळंदे यांच्या शेडमध्ये घुसून चार महिन्याच्या गर्भवती शेळीवर हल्ला करून शेजारील जाधव यांच्या गिनी गवताच्या शेतामध्ये नेऊन शेळीवर ताव मारला. रविवारी सकाळी वनविभागाचे कर्मचारी पठाण यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

प्रवरा नदी काठच्या परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. शेतात काम करताना, रस्त्याने फिरणाऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले होत आहेत. बेलापूर, केसापूर, आंबी, अंमळनेर हा भाग बागायती पट्टा असल्याने ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी आयती जागा मिळत आहे. बिबटे मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे, कुत्री या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना भक्ष्य बनवीत आहेत.

गेल्या काही दिवसांत परिसरात मनुष्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अंमळनेरचे पोलिस पाटील सुरेश जाधव, सरपंच भारत जाधव, उपसरपंच किरण कोळसे, ग्रामपंचायत सदस्य दादा साळुंके, कोंडीराम साळुंके, माजी सरपंच रोहन जाधव, रवी पाळंदे, नंदकिशोर जाधव, माजी उपसरपंच संजय पाळंदे, दिपक पाळंदे, प्रविण पाळंदे, पेंटर रविंद्र पाळंदे, बागुल, पोपट पाळंदे, जॉन पाळंदे, पत्रकार संदिप पाळंदे यांच्यासह प्रवरा पंचक्रोशीतून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com