
लोणी | दादासाहेब म्हस्के
चित्रामध्ये आणि अपवादाने सिनेमात बघितलेला बिबट्या एक दिवस आपल्या शेतात आणि घराच्या अंगणात येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण आता अशी परिस्थिती झाली आहे की, जिकडे तिकडे बिबटेच बिबटे. अनेकांवर हल्ले झाले, काही जखमी झाले तर काहींचे प्राण गेले. सर्वत्र दहशतीचे वातावरण. बिबट्याचा कधी सामना होईल हे सांगता येत नाही. अशा भयावह परिस्थितीत एक आठवडा दिवसा तर एक आठवडा रात्रीची वीज शेतीसाठी मिळते. गेल्या दहा वर्षात बिबट्यांची झपाट्याने झालेली वाढ बघितल्यावर आणखी पाच वर्षांनी शेती पिकवणे तर अशक्य होईलच पण गावात, वाड्यावस्त्यावर रहाणेही कठीण होऊन बसेल. या चिंतेने ग्रासलेला बळीराजा सरकारला आर्त हाक देऊन म्हणतोय तुम्हीच सांगा आम्ही शेती करायची कशी?
निसर्गातील प्रत्येक जीवाचे अस्तित्व महत्वाचे आहेच यात कोणतीही शंका नाही. किंबहुना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ते खूप गरजेचे आहे. जीव जीवस्य जीवनम हा निसर्ग नियम आहे. पूर्वी सर्कसचा काळ होता. जंगलातले प्राणी जे शाळेत चित्रात दाखवून गुरुजी त्यांची ओळख करून द्यायचे. पण त्यातील काही फक्त सर्कसमुळे प्रत्यक्ष बघण्याची संधी होती.आता सर्कस राहिल्या नाही. नव्या पिढीला आता चित्र आणि फिल्म यांच्या माध्यमातून ते बघायला मिळतात.
आपल्या भागातील शेतकऱ्यांनी कोल्हे, लांडगे, तरस, रान डुकरे हे प्राणी नेहमी बघितले. त्यांच्याकडून थोडेफार पिकांचे नुकसान व्हायचे पण ते अत्यल्प असल्याने त्याकडे शेतकरी दुर्लक्ष करायचे. मात्र दहा-बारा वर्षांपूर्वी जंगलातले बिबटे नगर सारख्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसू लागले. त्यांची संख्या नगण्य असल्याने भीती निर्माण झाली पण ती मर्यादित स्वरूपाची होती. परंतु बिबट्यांची संख्या एवढी झपाट्याने वाढेल याचा अंदाज कुणालाच नव्हता.
सुरुवातीच्या काळात कुत्री, शेळया,कोंबड्या यांना बिबट्यांनी लक्ष्य केले. शेतकऱ्यांनी या प्राण्यांच्या संरक्षणासाठी घर, गोठा यांना लोखंडी जाळीचे कुंपण केले. तरीही झाडांचा, घराचा आधार घेऊन बिबट्यांनी या प्राण्यांची शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत आणि आजही घडत आहेत. गायींच्या गोठ्यात घुसून हल्ला करून त्यांना ठार केल्याचा घटनाही अनेक घडल्या आहेत. शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर, दुचाकीवरून जाणारे नागरिक यांच्यावरही बिबट्यांनी हल्ले केले आहेत.
बिबट्यांपासून जनावरे, लहान मुलं आणि स्वतःचे संरक्षण कसे करायची याची चिंता प्रत्येक शेतकऱ्याला लागली आहे. वन खाते नुकसान भरपाई देते पण कुटुंबातील माणूस गमावण्याची किंमत किती? आज शेतीसाठी मजूर मिळत नाहीत. अनेक वयोवृद्ध शेतकरी त्यांची शारीरिक क्षमता नसतानाही शेतीत राबत आहेत. अन्नदाता म्हणून त्यांचे गोडवे गाण्यापेक्षा त्यांच्या जीवाचे संरक्षण कसे करता येईल यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
प्राप्त माहिती नुसार आज नगर जिल्ह्यात किमान पाचशे बिबटे आहेत असे जाणकार सांगतात. त्यांची दरवर्षी वाढणारी संख्या विचारात घेता पुढील पाच वर्षात ही संख्या दोन ते तीन हजारांपर्यंत वाढू शकते. एवढी संख्या झाली तर शेतात दिवसाही जाणे शक्य होणार नाही. वन विभागाकडे बिबट्यांची मोजदाद करण्याची काही व्यवस्था असेल तर त्यांनी आकडेवारी जाहीर करायला हवी.
शेतकरी सरकारकडे त्याच्या जीवाचे संरक्षण व्हावे म्हणून आशेने बघत आहे. हे बिबटे वन विभागाने जेरबंद करून ते जंगलात सोडायला हवेत. त्यासाठी लागणारे पिंजरे आणि मनुष्यबळ या खात्याकडे आहे का? नसतील तर त्याची व्यवस्था करायला हवी. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा आठ तास वीज देणे गरजेचे आहे. किमान धाडस करून जीव धोक्यात घालून तो यामुळे शेती पिकवू शकेल. रात्रीची वीज शेतीच्या अजिबात उपयोगाची नाही. त्यामुळे विजेचा आणि पाण्याचा अपव्यय अधिक होतो. नगदी पिकांना रात्रीच्यावेळी पाणी देता येत नाही.
शेतकऱ्यांनापुढे हा अतिशय गंभीर प्रश्न उभा आहे. बिबट्याच्या दहशतीने शेतमजूर कामावर येण्यास धजावत नाहीत. शेतीची कामे वेळीच करावी लागत असल्याने मजुरांना अधिक मोबदला देऊन कामे करून घ्यावी लागत आहेत. अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या समोर आलेल्या भावना मांडताना त्यांचा बिबट्याना विरोध नाही हे स्पष्ट दिसून आले. मात्र निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीला कसे सामोरे जायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे. सरकारने वेळीच मार्ग शोधला नाही तर शेती पडीक पडेल, उत्पादन घटेल आणि त्यातून शेतकऱ्यांचे अर्थकारण तर कोलमडून पडेलच पण अन्नदाता पिकवू शकला नाही तर शेतीमालाची टंचाई निर्माण होऊन भाववाढ होईल.
विदेशातून आयात करावी लागेल आणि त्याची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसेल. शेतकऱ्यांचा महत्वाचे दोनच प्रश्न आहेत आणि ते म्हणजे बिबटे पकडून जंगलात सोडण्यासाठी विशेष अभियान तातडीने सुरू करा आणि शेतीला दिवसा आठ तास वीज द्या. दोन्हीही मागण्या अवास्तव नाहीत. त्या मान्य करून कार्यवाही करण्यासाठी सरकारकडे लागणार आहे ती प्रबळ इच्छाशक्ती. ती सरकारकडे आहे की नाही हे पुढच्या काही दिवसात कळेलच. तोपर्यंत आहे त्या परिस्थितीचा सामना करणे एवढेच बळीराजाच्या हातात आहे.
सभागृहात चर्चा व्हायला हवी होती....
शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अशा याविषयावर सभागृहात यापूर्वीच चर्चा व्हायला हवी होती. राज्य विधिमंडळात शेतकरी कुटुंबातील किमान दोनशे आमदार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात हा प्रश्न भेडसावत असताना आतापर्यत एकही लोकप्रतिनिधीने तो सभागृहात मांडला नाही. हा प्रश्न कसा सोडवायचा याची चर्चा सभागृहात झाली तर त्यावर सर्वमान्य मार्ग निघू शकेल. आता तरी पुढच्या अधिवेशनात यावर चर्चा होईल अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे.