शेवगावमध्ये शेतात मृत अवस्थेत आढळला बिबट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शेवगावमध्ये शेतात मृत अवस्थेत आढळला बिबट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शेवगाव | शहर प्रतिनिधी

शेवगाव शहरापासून २ की मी अंतरावर असलेल्या दादेगाव रस्त्यावरील माळीवाडा परिसरात एका शेताच्या बांधावर बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

या ठिकाणी कुत्र्यांची टोळी ओरडत असल्याचे पाहुन काही शेतकरी घटना स्थळी गेले. त्यावेळी मृत बिबट्या झोपलेल्या अवस्थेत असल्याचे समजुन अनेकांनी तेथुन धूम ठोकली. ही माहिती परिसरात पसरताच काहींनी धाडस करून पहुडलेल्या बिबट्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो मृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले

शेवगाव परिसरात दोन दिवस वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली. या वादळात विजेच्या खांबावरील तार तुटून ती बांधावर पडली होती. बिबट्याचा पाय वीज प्रवाह असलेल्या तारेत अडकुन ही घटना घडली असावी. बिबट्याने ही तार दाताने तोडण्याचा प्रयत्न केल्याने विजेचा झटका बसुन तो मृत झाला असावा असे वनविभागाने सांगितले. घटनेची माहिती समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, वनरक्षक अप्पा घनवट, नारायण दराडे, वनपाल रामदास शिरसाठ आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

शेवगाव येथील प्रभारी पशुधन विकास अधिकारी अमोल जाधव यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्या नंतर पाथर्डी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान या परिसरात गेल्या एक दिड महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याचा शेतकऱ्यांतून तक्रारी होत्या.

काही शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्याचे सांगितले होते. त्यामुळे वनविभागाने काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत. परिसरात आणखी काही बिबटे असावेत या भीतीने परिसरातील शेतकरी रात्रीच काय दिवसाही एकटे शेतात जाण्यास धजावत नाहीत. तसेच वस्तीवर राहणारे शेतकरी सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता बाळगुन आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com