बिबट्याच्या धास्तीने द्राक्षेही अडचणीत

बिबट्याच्या धास्तीने द्राक्षेही अडचणीत

राहाता तालुक्याच्या जिरायती भागात बिबट्याची प्रचंड दहशत

राहाता | Rahata

शेती पावसावर, दुष्काळ पाचवीला पुजलेला, विहिरीला थोडेफार पाणी आले तर त्या पाण्यावर एखादे पिक घेण्याची किमया साधणारा राहाता तालुक्यातील जिरायती टापू आता वेगळ्यात कारणाने त्यांचे पिके आता कोमेजू लागली आहेत. कारण आहे बिबट्याचा वावर!

राहाता तालुक्यातील जिरायत टापूत दोन दिवसांपुर्वी पिंप्री लोकई, काकडी शिवेवरील एक साठी ओलंडलेल्या शेतात पाणी भरत असलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला, त्यांना जखमी केले. त्या आगोदर पिंप्रीलोकई भागातील अनेक वस्त्यांवरील कुत्रे या बिबट्याने फस्त केले. त्यामुळे जिरायती टापू बिबट्याच्या वावराने धास्तावला आहे.

शेतातील उभ्या पिकात बिबट्या दबा धरुन बसतोय ही धारणा शेतकर्‍यांची धारणा त्या शेतकर्‍यावर हल्ला झाल्यापासून झाली आहे. अनेकांना त्याने दर्शनही दिले आहे. हा एकच बिबट्या की आणखी त्याला कोणी जोडी आहे. हे मात्र कुणालाही सांगता येत नाही. मात्र पिंप्रीलोकई, केलवड, आडगावचा पश्चिम भाग तसेच शेजारील कोपरगाव तालुक्यातील काकडी भागात प्रचंड दहशत पसरली आहे. शेजारी शिर्डी विमानतळ आहे. अर्थात विमानतळाच्या भिंतीमुळे तो विमानतळाच्या आत प्रवेश करु शकणार नाही. परंतु या भिंतीपासुन काही अंतरावर मात्र प्रचंड दहशत पसरली आहे.

या जिरायती टापूत जेमतेम पाण्यावर पिके घेतली जातात. त्यातच विज वितरण कंपनीचे शेतीसाठी रात्री विज देते. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे. पिके उभी आहेत, मात्र बिबट्याच्या भितीने शेतकर्‍यांनी शेतात रात्री पिकांना पाणी थांबविले आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. याबाबत पिंप्रीलोकई येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष गडगे म्हणाले, पिंप्रीलोकई, केलवड आणि आडगाव येथील शेतकरी बिबट्याच्या मुक्त संचारामुळे धास्तावले आहेत. आपल्या शेतात सहा एकर क्षेत्रावरील द्राक्षे पीक धोक्यात आले आहे. शेतातील द्राक्षे परिपक्व होत आली आहेत.

या द्राक्षांची काढणी महिन्यावर आली आहे. मका, हरबरा, कांदे हे पिके शेतात उभी आहेत. रात्री आम्हाला शेतीसाठी विज मिळते. पण बिबट्याच्या धास्तीने शेतात पाणी भरण्यास जाता येत नाही. परिणामी हाता तोंडाशी आलेला घास अडचणीत येत असल्याने मोठा मनस्ताप होत आहे. वितरण कंपनीने दिवसा वीज द्यावी, अशी अग्रही मागणी त्यांनी केली आहे. या बिबट्याला वनविभागाने पिंजरा लावून जेरबंद करावे, अन्यथा या भागातील पिकांचे, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होवु शकते. तसेच ग्रामस्थांमध्येही त्या शेतकर्‍यावर हल्ला केल्यामुळे प्रचंड दहशत पसरली आहे.

दुचाकीचाही पाटलाग

केलवड येथील रवींद्र गमे हे शिर्डी येथे साईबाबा संस्थानमध्ये सेवेत आहेत. ते सकाळी ड्युटीला जोडीदारासोबत दुचाकीवरुन जात असताना केलवड पाणी योजनेच्या तलावापासून काही अंतरावर केलवड-दहेगाव रोडवर त्यांच्या दुचाकीचा अचानक पाठलाग बिबट्याने केला. अचानक उद्भवलेल्या प्रकाराने या दुचाकी चालकाने आपल्या दुचाकीचा वेग वाढविला व ते पुढे निघुन गेले. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com