आरडगाव |वार्ताहर| Aradgav

मुळा डाव्या कालव्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबट्याचा पाटाच्या पाण्यात पडून मृत्यू झाला.

तसा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने आता त्याच्या मृत्यूवर होणार्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. त्याच्या मृत्यूचे खरे कारण समजू न शकल्यामुळे परिसरातून उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, बिबट्याच्या मृत्यूचे खरे कारण अखेर वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने सर्वच गोष्टींवर पडदा पडला आहे.

राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात आरडगाव परिसरात मुळा डाव्या कालव्यात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. दि.15 जानेवारीपासून मुळा डावा कालव्यात शेतीसाठी आवर्तन 200 क्युसेकने सुरू करण्यात आलेले होते. दि.2 फेब्रुवारीपासून मुसळवाडी तलावात आवर्तन वळविण्यात आले होते.

शुक्रवारी दि.5 फेब्रुवारी रोजी सकाळी मुसळवाडी तलावात जाणार्या पाटाच्या पाण्यात भलामोठा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी या बिबट्याला बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभाग व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव वाकडे यांनी पंचनामा केला.

परंतु बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला असावा? याचे खरे कराण समजू न शकल्याने त्याला विषबाधा झाली की काय? असा अंदाज प्रथमदर्शनी ग्रामस्थांनी लावला. पाटातील पाण्याने बिबट्या मरेलच कसा? शेतकर्यांच्या शेतातील विजेच्या तारीचे कुंपण केले, त्याचा तर धक्का लागला नसावा? असे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.

मुळा डाव्या कालव्यात मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबट्याचा पंचनामा करून उच्चस्तरीय तपासणीसाठी डिग्रस येथील शासकीय नर्सरी येथे शवविच्छेदन करून त्याचे तेथेच दहन केले आहे.
- भागवत परदेशी, वनविभागाचे वनमंडळ वन परिवेक्षक राहुरी.

शुक्रवारी दि.5 फेब्रुवारी रोजी बिबट्याचा शवविच्छेदन करून बिबट्याचा मृत्यू पाटाच्या पाण्यात बुडून झाला आहे. दोन्ही बाजूने भिंत असल्याने त्याला बाहेर पडता आले नसावे, नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे त्याची फुफ्फुसे निकामी झाली. पायांना व तोंडाला जखमा झाल्याचे आढळून आल्या आहे.
- डॉ. वैभव वाकडे