रस्तापूर शिवारात बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद

रस्तापूर शिवारात बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद

चांदा (वार्ताहर) -

नेवासा तालुक्यातील चांद्याजवळील रस्तापूर शिवारात वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात रात्री एक बिबट्या अडकला आणि

ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र अजूनही या परिसरात दोन बिबटे असल्याचे परिसरातील शेतकर्‍यांनी सांगितल्याने या परिसरात भीती कायम आहे.

अमृत बन्सीलाल मुथ्था यांच्या गट नं 315 मध्ये बांबू शेताकडेला गेल्या सोमवारी वन विभागाने या परिसरातील शेतकर्‍यांच्या मागणीनुसार पिंजरा लावला होता. या परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा सतत वावर असल्याचे तेथील शेतकर्‍यांचे म्हणणे होते. याठिकाणी लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्याला भक्ष्य म्हणून एक शेळी ठेवण्यात आली होती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भक्षाच्या शोधार्थ या ठिकाणी आलेला बिबट्या अलगत पिंजर्‍यात अडकला. त्याच बाजूला दिलीप आठरे, राजू बर्डे, नानासाहेब पुंड हे रात्री गव्हाला पाणी देत होते. त्याच्यापासून साधारण पाचशे फुटाच्या अंतरावर हा पिंजरा होता. बिबट्या पिंजर्‍यात जात दरवाजा लॉक पडल्याचा आवाज या दोघांनाही आला. पहाटे त्यांनी बॅटरीच्या प्रकाशझोतात पाहिले असता बिबट्या पिंजर्‍यात दिसला. त्यांनी चांदा गावचे पोलीस पाटील कैलास अभिनव तसेच रस्तापूरचे सरपंच वसंत उकिर्डे यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. के. पातारे यांच्या सुचनेनुसार नेवासा वन विभागाचे एम. आय. सय्यद, डी. टी. गाडे, सी. ई. ढेरे याच्या पथकाने योग्य नियोजन करत जेरबंद बिबट्याला तातडीने हलविले. बिबट्याला पाहण्यासाठी भल्या सकाळी गर्दी झाली होती. अनेकांनी मोबाईल कॅमेर्‍यात बिबट्याला टिपले. या ठिकाणीच पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी यावेळी उपस्थित युवक शेतकर्‍यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com