पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याने पिंजरा तोडून केले पलायन

पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याने पिंजरा तोडून केले पलायन

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर व खोकर परीसरात धुमाकुळ घालत असलेल्या बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात अडकला, मात्र त्याने पिंजरा तोडून, जमिनीला खड्डा करत पिंजर्‍यातून पलायन केल्याची घटना घडली. या घटनेने शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाली असून वनविभागाचीही चांगलीच धांदल उडाली आहे. आता हा पिंजरा दुरूस्त होणार का? नवीन पिंजरा लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून परीसरातील खोकर, भोकर व कारेगाव परीसरात धुमाकुळ घालत बिबट्याने अनेक शेतकर्‍यांच्या शेळ्या, बोकड व कुत्रे फस्त करणार्‍या बिबट्याचे दर्शन ही या शेतकर्‍यांना नित्याचेच झाले होते. यापुर्वी सुमारे पाच वर्षापुर्वी भोकर व खोकर येथील महिला व पुरूषांवर हल्ला केला होता, त्यावेळी खोकर व भोकर परीसरात वनविभागाने या परीसरातील बिबट्या व बिबट्याची मादी जेरबंद करण्यासाठी तब्बल नऊ पिंजरे लावून सावजाचे प्रतिक्षेत होते. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतरही त्यावेळी वनविभागाला रित्या हातानेच परतावे लागले होते.

अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर या शेतकर्‍यांच्या शेतात वनपाल भाऊसाहेब गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विकास पवार व सुर्यकांत लांडे यांनी कारभारी शिंदे यांचे गट नं.146 मध्ये मंगळवार दि.25 मे रोजी या परीसरातील बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. त्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद होण्यासाठी या शेतकर्‍यांनी भक्ष्य म्हणून एक शेळी व एक कोंबडा ठेवला होता. त्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाल्याचे शिंदे कुटूंबियांच्या लक्षात आले. काहींनी घराबाहेर निघुन त्या पिंजर्‍याकडे जाण्याचा प्रयत्न केला परंतू त्यावेळी एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी दुसरा त्या बिबट्याला सोडविण्यासाठी पिंजर्‍याच्या बाजुने घिरट्या घालत असल्याचे त्यांचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. काही वेळाने दोन्ही बिबट्यांचा आवाज बंद झाला.

सकाळी या शेतकर्‍यांनी त्या पिंजर्‍याकडे जावून पाहिले असता त्या पिंजर्‍याचा खालचा भाग तोडून, त्या खालची जमीन उकरून बिबट्याने पलायन केल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच वनविभागाशी संपर्क केला. वनविभागाचे मदतनिस सुर्यकांत लांडे यांनी भेट देवून पाहणी करत हा पिंजरा तातडीने दुरूस्त करू किंवा दुसरा पिंजरा लावून देवू असे सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com