बिबट्याचा हल्लात मुलगा गंभीर जखमी; परिसरातील नागरिकांमध्ये दहशत

FIle Photo
FIle Photo

टाकळीमिया | वार्ताहर

राहुरी तालुक्यातील जातप शिवारात बोंबले वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभीर झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

मयुर आदिनाथ बोंबले (वय 14) असे या जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास मयुर हा घास कापण्यासाठी शेतात गेला. तो घास कापत असताना कपाशीतून बिबट्याने दबक्या पावलाने येऊन मयुरवर झडप घातली. मयुरच्या मानेला जबड्यात धरून त्याला कपाशीच्या पिकात फरफटत ओढत नेत असताना पाहून मयूरच्या भावाने आरडाओरड केली. मुलांचा आरडाओरडा ऐकून मुलांच्या आई आशाबाई बोंबले, त्याचे वडिल व त्याच्या दोन बहिणी पळत येऊन गिन्नी गवताच्या ताटाने बिबट्याला मारल्याने त्याने मयुरला सोडून कपाशीत पळ काढला. बिबट्याने मयुरची मान पकडल्याने दात घुसल्याने मयुर रक्तबंबाळ झाला.

मुलाच्या जिवासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणार्‍या आईचे दर्शन घडल्याने मयुर या हल्ल्यातून वाचला. आरडाओरडा ऐकून आजुबाच्या वस्तीवरील लोकही जमा झाले. कुटुंबीय त्याला ताबडतोब नगर येथे सिव्हील हॉस्पीटलला घेऊन गेले. तेथे मयूरवर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती आ. प्राजक्त तनपुरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन बोबले कुटुंबियांना धीर दिला व भ्रमणध्वनीद्वारे नगर येथिल शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या जखमीची विचारपूस केली असता तेथिल वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुलाच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे सांगितले. यामुळे बोबले कुटुंबाचे समाधान झाले. यावेळी आ. तनपुरे यांनी घटनास्थळी पाहणी केली.

ज्या घासाच्या वाफ्यातून मुलाला फरफटत बिबट्याने शेजारी असलेल्या कपाशी मध्ये नेले त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात रक्त पडलेले दिसले.

आ.तनपुरे यांनी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना महत्वाच्या सुचना देऊन या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे व रात्रभर गस्त सुरु ठेवण्यास सांगितले. बिबट्यांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करुन जेरबंद करता येईल का? याबाबत वरीष्ठांशी चर्चा करण्यास सांगितले.

राहुरी तालुक्यात गेल्या चार दिवसात बिबट्याने हल्ला करुन जखमी झालेल्यांंची संख्या दोनवर गेली आहे. एका घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे तर दुसर्‍या घटनेत शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. शासन याकडे कधी गांभीर्याने बघणार आहे? आणखी एखादा बळी गेल्यावर शासन यावर नियंत्रण आणणार आहे का? असा संतप्त सवाल करुन 1972 चा वन्यजिव कायद्यात केंद्र सरकारने बदल करुन बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा सरकार विरोधी तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा संतप्त इशारा माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे, वनरक्षक सतिश जाधव,मदन गाडेकर,समाधान चव्हाण, महादेव शेळके, ताराचंद गायकवाड यांच्यासह वनविभागाचे पथक घटना स्थळी हजर झाले. जायकर व जाधव हे दोन कर्मचारी नगर येथे शासकीय रुग्णालयात जखमीवर लक्ष ठेवून आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी पाचरणे यांनी घटनेची पाहाणी करुन या परिसरात दोन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. या घटनेत एक मादी व तिच्यासोबत एक बछडे असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश निमसे, सचिन भिंगारदे, संपतराव जाधव, जखमी विद्यार्थ्याचे आजोबा साहेबराव बोंबले, विलास बोंबले, संजय बोबले आदी उपस्थित होते.

विधानसभेत आवाज उठवणार - आ. तनपुरे

1972 च्या वन्यजीव कायद्यात बदल झाला पाहिजे. बिबटे मानवी वस्ती मध्ये घूसू लागले आहेत. माणसाचा जिव गेला तरी चालेल पण, बिबट्या वाचला पाहिजे असे सरकारचे धोरण आहे का? वनविभागाने बिबट्यांची नसबंदी करावी म्हणजे त्यांची पैदास वाढणार नाही. हे कमी होते की काय, म्हणून सरकारने परदेशातून चित्ते आयात केले. असा टोला हाणून आज ग्रामीण भागात कधी अनुचित प्रकार घडेल याचा नेम नाही. यासाठी आपण विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचे माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com