वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev
ऊस तोडणीसाठी जात असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. मात्र या हल्ल्यातून तरुण बालंबाल बचावला. श्रीरामपूर-नेवासा रोडवरील तैय्यबजी फार्म हाऊस समोर पहाटेच्यावेळी ही घटना घडली.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील नेवासा रोडवरील तैय्यबजी फार्म हाऊस समोरील रोडवरून राऊत वस्ती परिसरातील मुस्ताक इस्माईल शेख हा तरुण पहाटे पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान ऊस तोडणी करिता जात होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मुस्ताक यांच्या दुचाकी वाहनावर हल्ला केला. प्रसंगावधान राखत मुस्ताक यांनी वाहनाचा वेग वाढवताच बिबट्याची झेप दुचाकीच्या मागील सीटवर पडली. बिबट्याचे दोन्ही पंजे मागील सीटवर पडल्याने मुस्ताक शेख यांचा जीव बचावला.
यापूर्वी याठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेने रस्त्यावर प्रवास करणार्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात पाहणी करून पिंजरा बसवावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल शेख, मुनीर सय्यद यांनी केली आहे.