
टाकळीभान (वार्ताहर)
टाकळीभान येथे बिबट्याने भर दुपारी 12 वा. खोडवा ऊसात चारा खात असलेल्या शेळ्यांच्या कळपातील सुमारे 12 शेळ्या व बकरांवर हल्ला केला. यातील 5 शेळ्या मृत झाल्या असून 4 शेळ्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. तर कळपातील 3 शेळ्या गायब आहेत. या भागातील बिबट्याचा आजपर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
टाकळीभान शिवारातील गट नंबर 316 मध्ये काकासाहेब विनायक डिके यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. काकासाहेब यांचे बंधू भास्करराव हे नेहमीप्रमाणे आपला 24 शेळ्यांचा कळप घेऊन शेजारीच असलेल्या गट नंबर 323 मध्ये खोडवा ऊसात शेळ्या चारीत होते. खोडवा ऊसाचे पिक छातीभर वाढलेले असल्याने भास्कर डिके हे बांधावरील झाडाखाली बसुन शेळ्यांवर लक्ष ठेवुन होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेळ्यांचा ऊसातून ओरडण्याचा गोंगाट ऐकू आला तर काही शेळ्या ऊसातून सैरभैर बाहेर पळाल्या. व शेजारी असलेल्या घराच्या दिशेने धावत सुटल्या.
भास्कर डिके यांच्या ही बाब लक्षात आली. नक्कीच बिबट्या आसावा असा अंदाज करुन आरडाओरड केल्याने शेजारील वस्तीवरील कुटुंब धावत आले. मात्र ऊस वाढलेला असल्याने व बिबट्याच्या धास्तीने ऊसात शिरण्याचे धाडस होत नव्हते. ही बातमी शेजारच्या वस्त्यांवर पसरताच सगळ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व धाडसाने ऊसात शोधमोहीम सुरु केली. या मोहीमेत 5 शेळ्या ऊसातच मृत अवस्थेत मिळुन आल्या तर 4 जखमी अवस्थेत सापडल्या. मात्र 3 शेळ्यांचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.
याबाबत वन विभागाचे कर्मचारी विकास पवार यांना माहीती देण्यात आली. वरीष्ठ अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनाही कळविण्यात आले. पशुवैद्यकिय विभागालाही माहीती देण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत कोणीही घटनास्थळाकडे फिरकले नाही. परीसरात आजपर्यंतची ही सर्वात मोठी घटना असली तरी संबधित विभागाची याबाबत उदासिनता दिसुन येत आहे. या घटनेत बिबटे निश्चितच एकापेक्षा जास्त असावेत, या धास्तीने परीसर भयभित झाला आहे.