बिबट्याच्या हल्ल्यात अस्तगावला 7 मेंढ्या तर चोळकेवाडीला एक शेळी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात अस्तगावला 7 मेंढ्या तर चोळकेवाडीला एक शेळी ठार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

अस्तगाव येथे मंगळवारी पहाटे 4.30 वाजता बिबट्याने सापते वस्तीवर चाल करत राजेंद्र सोपान सापते यांच्या दहा मेंढ्यावर प्राणघातक हल्ला चढवला. त्यात 5 मेंढ्या जागीच गतप्राण झाल्या. उर्वरीत 5 मेंढ्या जबर जखमी केल्या. जखमी 5 मेढ्यांपैकी काल बुधवारी 2 मेढ्यांनी आपले प्राण सोडले. सापते यांच्या मृत मेंढ्यांची संख्या आता 7 झाल्याने या मेंढपाळाचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.

अस्तगावपासून पश्चिमेला एक किमी अंतरावर तळ्याला खेटून राजेंद्र सापते वस्ती आहे. त्यांच्या घराशेजारील मेंढ्यांचा वाडग्यात जवळपास लहानमोठ्या विस मेंढ्या तेथे वाडग्यात ठेवलेल्या होत्या. मंगळवारी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान मेंढ्यांच्या हालचालीचा व गोंगाटचा आवाज आल्याने सापते कुटुंबीय जागे झाले. मेंढ्याच्या वाडग्यात काहीतरी झाले समजून पटकन बाहेर आले. याची चाहुल लागताच त्यांच्या समक्ष काहीतरी जनावर वाड्यातून बाहेर पळताना दिसले. परंतु पहाटेच्या अंधारामुळे काय होते तेव्हा त्यांना कळले नाही.

राजेंद्र सापते यांनी वाड्यात जाऊन पाहिले असता सर्व मेंढ्या भेदरलेल्या अवस्थेत एका कोपर्‍यात उभ्या दिसल्या आणि काही मेंढ्या मेलेल्या अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यांना झालेला प्रकार लक्षात आला. त्यांच्या बोलण्याच्या गोंगाटमुळे संपूर्ण सापते वस्ती जागी झाली. सर्वांनी मिळून आत जाऊन पाहिले तेव्हा पाच लहान मोठ्या मेंढ्या मृतावस्थेत आढळल्या व पाच मेंढ्या जबर जखमी अवस्थेत आढळून आल्या.

सकाळी खासगी पशुवैद्यक डॉ. सतीश गाडेकर यांना बोलावून आजारी पाच मेंढ्यावर उपचार करून घेतले व येथील पशुवैद्यकिय दवाखान्याचे सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ. उमेश पंडुरे यांना भ्रमणध्वनीवर झालेल्या प्रकाराची माहिती दिली. डॉ. पंडुरे यांनी वनरक्षक साकरे यांना कळवले.

डॉ. उमेश पंडुरे व वनरक्षक साखरे यांनी प्रत्यक्ष पहाणी करून पंचनामा केला असता संजय साखरे यांनी बिबट्याने हल्ला करून पाच मेंढ्या मारल्या व पाच मेंढ्या जखमी केल्याचा अहवाल दिला.

चोळकेवाडी येथे अंगणवाडी शाळेजवळ राहत असलेले वसंत चांगदेव गाढे यांच्या तीन वर्षे वयाच्या व्यायला झालेल्या मोठ्या शेळीस बिबट्याने घरासमोरून ओढत नेऊन समोरील उसात फडशा पाडला.

सकाळी वसंत गाढे यांनी शेळी फरफटत नेल्याच्या मागाने उसात जाऊन पाहिले असता त्यांची शेळी मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर त्यांनी अस्तगावचे डॉ. उमेश पंडुरे यांना रात्री झालेल्या घटनेची माहिती दिली. डॉ. पंडुरे यांनी वनरक्षक संजय साखरे यांना कळविण्यास सांगितले. तात्काळ वनरक्षक साकरे व डॉ. पंडुरे यांनी समक्ष भेट देऊन पंचनामा केला.

गाडे यांनी सकाळी उसात जाऊन पाहिले तेव्हा शेळी थोडी खाल्लेली होती. दरम्यान पंचनाम्यासाठी आलेले डॉ. उमेश पंडुरे यांनी वसंत गाढे यांना उसातून शेळी बाहेर आणायला सांगतले. तीन तासाने शेळी उसातून बाहेर आणण्यास गेले तेव्हा बिबट्याने शेळी बरीच खाल्लेली होती. बिबट्या याच वेळी उसात उपस्थित होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com