
अस्तगाव | वार्ताहर | Astgaon
तीन दिवसांपुर्वी लोणी येथे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेतात बिबट्या आढळून आला होता. जि.प. माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व त्यांचे दोन नातु शेतात वनभोजनासाठी आले असता त्यांच्या जवळून कुत्रे बिबट्याने उचलले होते. याप्रकाराने खळबळ उडाली होती. त्यातच राहाता तालुक्यातील पिंपळस शिवारात
गुरावे वस्तीनजीक बिबट्याने दोन मोकट कुत्र्यांचा फडशा पाडला. एका कुत्र्याला बाभळीच्या झाडावर नेऊन त्याच्यावर ताव मारला. या प्रकाराने पिंपळस शिवारात घबराट पसरली आहे.
पिंपळस हद्दीत गोदावरी कालव्याच्या पुर्व बाजुला नंदुशेट मदन गुरावे यांची वस्ती आहे. त्याच्या वस्तीनजीक 200 ते 300 मिटर अंतरावर पेरुचा बाग आहे. त्या शेतात एक कुत्रे तसेच बाभळीच्या झाडावर एक कुत्रे फस्त केल्याचे काल सकाळी शेतात कामाला जाणार्या महिलांच्या लक्षात आले. त्यांना बिबट्याचा अंदाज आल्याने हि माहिती पिंपळसचे सरपंच दत्तात्रय घोगळ यांना माहिती दिली. त्यांनी येवुन पाहाणी केली असता, बिबट्याने दोन्ही कुत्रे फस्त केल्याचे त्यांच्या लक्षात आले. बिबट्याच्या पावलांचे ठसेही त्यांना दिसून आले. सदर फस्त केलेले कुत्रे हे मोकाट होते. बिबट्याचा शिरकाव पिंपळस परिसरात झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. ज्या ठिकाणी हे कुत्रे फस्त केले तो परिसर पेरु व अन्य पिकांचा आहे. त्या भागात मोठे लपण असल्याने बिबट्याचा वावर त्या ठिकाणी काही काळ तरी राहु शकतो. त्यामुळे या परिसरात बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी सरपंच घोगळ यांनी वनविभागाकडे केली आहे. बिबट्याचा वावर पिंपळस शिवारात असल्याने त्याची माहिती त्यांनी राहाता पोलिस ठाणे, वनविभाग संगमनेर, वनविभाग कोपरगाव यांना माहिती दिली.