बिबट्याने पाडला दोन कुत्र्यांचा फडशा!

जवाहरवाडी शिवारात पसरली घबराट
बिबट्याने पाडला दोन कुत्र्यांचा फडशा!

रांजणखोल | वार्ताहर

एकलहरे शिवारात रांजणखोल ते जवाहरवाडी रस्त्यालगत असलेल्या जवाहरवाडी परिसरात एका वस्तीनजीक बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडला. एका कुत्र्याला आंब्याच्या झाडावर नेऊन बिबट्याने त्याच्यावर ताव मारला. या प्रकाराने जवाहरवाडी, रांजणखोल व एकलहरे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

एकलहरे परिसरात ईस्माईल जहागिरदार यांची वस्ती आहे. त्याच्या वस्तीनजीक एका झाडावर एक कुत्रे फस्त केल्याचे काल सकाळी शेतात गेल्यावर जहागिरदार यांच्या लक्षात आले. त्यांना बिबट्यानी दोन कुत्र्यांचा फडशा पडल्याचा अंदाज आल्याने हि माहिती एकलहरेचे सरपंच यांना माहिती दिली. त्यांनी येवुन पाहाणी केली असता, बिबट्याने दोन्ही कुत्रे फस्त केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

बिबट्याच्या पावलांचे ठसेही त्यांना दिसून आले. सदर फस्त केलेले कुत्रे हे मोकाट होते. बिबट्याचा शिरकाव जवाहरवाडी व बेलापुर रस्त्यावर असल्याने टिळकनगर व रांजणखोल येथील ग्रामस्थ बेलापुरला जवाहरवाडी परिसरातील रस्त्यावरुन ये-जा करतात परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

ज्या ठिकाणी हे कुत्रे फस्त केले तो परिसर पिकांचा आहे. त्या भागात मोठे लपण असल्याने बिबट्याचा वावर त्या ठिकाणी काही काळ तरी राहु शकतो. त्यामुळे या परिसरात बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी एकलहरेचे ऊपसरपंच रमेश कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते विलासराव ठोंबरे, राजु आगरवाल, भाऊसाहेब ठोंबरे यांनी वनविभागाकडे केली आहे. बिबट्याचा वावर कायम परिसरात असल्याने त्याची माहिती त्यांनी वनविभाग अधिकारी श्री.सुराशे, गाडे बी एस यांच्याशी संपर्क करुन त्यांना माहिती दिली. संबधित वनअधिकारी यांनी घटनेची पाहणी करुन पंचनामा केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com