नायगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात दोन बोकडांचा फडशा

मनुष्य बळी गेल्यावर पिंजरा लावणार का? ग्रामस्थांचा सवाल
नायगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात दोन बोकडांचा फडशा

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर, रामपूर जाफराबाद, नायगाव आदी भागात बिबट्याने मोठी दहशत पसरवली आहे. या भागात एका मादीसह दोन बछडे असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे. नुकतेच नायगाव येथील वसंत खंडेराव देसाई यांच्या गट नंबर 60/1 मधील वस्तीवर बिबट्याने दोन बोकडांचा फडशा पाडला. या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून बिबट्याने गोदावरी परिसरात मोठी दहशत पसरली आहे. सायंकाळच्या वेळेस श्रीरामपूरवरून गावाकडे जाताना दुचाकीस्वारांना मोठ्या प्रमाणात भीती सतावत आहे. बिबट्याने आतापर्यंत तीन ते चार दुचाकीस्वारांवर हल्ला केला असून रामपूर शिवारातील भडांगे यांच्या शेळीसह रामपूर भागातील अनेक कुत्रे फस्त केले आहेत. बिबट्याने रामपूरनंतर नाऊर येथील शिंदे वस्तीवरील मोठ्या गायीचा देखील फडशा पाडला. त्यानंतर जाफराबाद आणि नायगाव या परिसरात रोज सायंकाळच्या वेळेस बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे.

जाफराबाद शिवारातील भोसले वस्तीवर लहान मुलीवर देखील बिबट्याच्या हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मात्र सुदैवाने मुलीचा मामाच्या आरडा ओरडीमुळे बिबट्या आणि बछडे पळाले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. तसेच पवार यांच्या वस्तीवर कामाला असलेल्या मजुराच्या चालत्या दुचाकीवर देखील हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यांच्याच वस्तीवर शेळ्या बांधलेल्या शेडलाही काल रात्री बिबट्याने धडका दिल्या. मात्र दरवाजा न तुटल्याने बिबट्याने माघार घेतली. या घटनेने त्या कुटुंबाला लहान मुलांसह रात्र जागून काढावी लागली. त्यामुळे बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातून जोर धरू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com