बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी; बिबट्याचा मृत्यू
File photo

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी; बिबट्याचा मृत्यू

नागरिकांमध्ये घबराट : शेतकर्‍यांवर उपचार तर बिबट्यावर अंत्यसंस्कार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील कळस येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर हल्ला केल्यानंतर काही तासांनी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून मृत बिबट्याचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

पारनेर तालुक्यातील कळस गावातील मेंढे मळ्यातील पोपट येवले (वय 72), सुदर्शन घाडगे (वय 30) या शेतकर्‍यांवर 18 तारखेला बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. दोघेही ही संध्याकाळी सातच्या सुमारास शेतातील कामे आटोपून घरी जात असताना हा हल्ला झाला. सोबत असणार्‍या महिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार चालू असून पोपट येवले या वृद्धांच्या मानेवर गंभीर जखमा आहेत. मात्र सध्या प्रकृती स्थिर आहे, तर सुदर्शन येवले यांच्या हातावर व इतर ठिकाणी जखमा असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

तसेच बिबट्याने गाईवर हल्ला केला त्यात गाय जखमी झाली आहे. तर रात्रीच्या सुमारास हल्ला केलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला. 19 तारखेला तेथील शेतकर्‍यांना बिबट्या शेतात निपचित पडला असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळवले. पथकाने पाहणी केल्यानंतर बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. बिबट्या काही दिवसापासून उपाशी असल्याने भुकेने व्याकूळ झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तविला आहे.

वनविभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच बिबट्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक अहमदनगर एस. एस. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे, वनपाल नाना जाधव, संदीप भोसले एस. एस. जाधव, छबु रोडे, वनरक्षक हरी आठरे,उमेश खराडे, गजानन वाघमारे व आदी वनमजूर उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com