
अस्तगाव |वार्ताहर| Astgav
सहा फुट जाळीवरुन उडी मारुन आत येत बिबट्याने शेडमध्ये बांधलेल्या 2 मोठ्या शेळ्यांचा फडशा पाडला. यात एक जखमी केली तर एक बोकड घेवुन धूम ठोकली. हा प्रकार अस्तगाव येथे पहाटे चार वाजता झापाचा मळा भागात घडला.
नगर मनमाड रस्त्याच्या पश्चिमेला खडकेवाके रोड लगत नळे वस्तीवरील पोपट साहेबराव नळे यांच्या जनावरांच्या शेडला सहा फुट जाळी लावलेली असताना बिबट्याने पहाटे 4 वाजता शेडलगत असलेल्या लिंबाच्या झाडावर चढून शेडच्या गेटवर उतरुन आत प्रवेश केला. पहिल्यांदा दोन मोठ्या शेळ्यांचा फडशा पाडला. नंतर एका शेळीला जखमी केले व एक चार महिन्याच्या बोकडाला घेवून गायींच्या गव्हाणीवर चढून जाळीच्या बाहेर उडी मारत धुम ठोकली. या शेळ्यांमध्ये एक शेळी गाभण होती.
हा प्रकार सुरु असताना नळे कुटूंबिय जागे झाले. परंतु अंधारात त्यांना बिबट्या दिसून आला नाही. त्यामुळे अंधाराचा फायदा घेत बिबट्याने बोकडाला घेवुन धूम ठोकली. त्यामुळे या शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे. नळे यांच्या जखमी शेळीवर पशुवैद्यक डॉ. उमेश पंडूरे यांनी उपचार केले. अन्य शेळ्यावर व बोकडाचा पंचनामा केला. दरम्यान अस्तगाव परिसरात बिबट्याचा अनेक दिवसापासून मुक्काम असून अनेक ठिकाणी त्याने आपल्या करामती दाखवत पशुपालकांचे मोठे नुकसान केले आहे. या बिबट्याना वनविभागाने जेरबंद करावे, अशी मागणी सरपंच नवनाथ नळे यांनी केली आहे.