शिरसगाव परिसरात बिबट्याचा शेळीवर हल्ला

महिलेच्या सतर्कतेने शेळीचे प्राण वाचले
शिरसगाव परिसरात बिबट्याचा शेळीवर हल्ला

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील बकालवस्ती परिसरात बिबट्याने शेळीवर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखत महिलेने लाकडी दांडा बिबट्याच्या डोक्यात मारल्याने त्याने तेथून धूम ठोकली. काल दुपारी ही घटना घडली.

शिरसगाव येथील बकालवस्ती परिसरातील अकीला अकबर शेख या नेहमीप्रमाणे शेतात शेळ्या चारण्याचे काम करीत होत्या. सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेतात शेळ्या चरत असताना परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेख यांच्या जवळ असलेल्या शेळीवर हल्ला केला. यावेळी शेख प्रचंड घाबरल्या. त्यावेळी बिबट्याचा शेळीला जबड्यात घेण्याचा प्रयत्नात असताना त्यांनी प्रसंगावधान राखत आपल्या हातातील लाकडी दांडा बिबट्याच्या डोक्यात मारला. त्यामुळे बिबट्याने गुरगुरत घटनास्थळापासून धूम ठोकली. या प्रसंगातून शेळीचा बचाव झाला असला तरी तिच्या डोक्याला मोठी जखम झाली.

अकिला शेख यांनी आरडाओरड करत घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी लाठ्या काठ्या घेऊन फटाके वाजविले. तसेच चंदुलाल शेख यांनी सरपंच आबासाहेब गवारे यांना घटनेची माहिती दिली. सरपंच गवारे यांनी घटनास्थळी भेट देत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. सरपंच गवारे यांनी शेख यांच्या तब्येतीची चौकशी करत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.

परिसरात अनेक दिवसापासून बिबट्याचे वास्तव्य असून यापूर्वी परिसरात शेळ्या व कुत्रे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. येथील आरटीओ कार्यालय, शासकीय रुग्णालय, पाटाच्या कडेला अनेकांनी बिबट्यास पाहिले आहे. परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी सरपंच गवारे यांनी वन विभागाकडे केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत बारसे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड, राजेंद्रदेसाई यांनी घटनास्थळी भेट दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com