केशव गोविंद बनासमोर बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

केशव गोविंद बनासमोर बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

आंबी |वार्ताहर| Ambi

राहुरी तालुक्यातील केसापूर येथील शेतकरी उत्तम बाबुराव मेहेत्रे हे मंगळवार सकाळी सहा वाजेच्या सुमारास बेलापूर वरून आपल्या घराकडे केसापूर येथे परतत असताना केशव गोविंद बन समोर महाडिक मळा परिसरात मेहेत्रे यांच्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मेहेत्रे बालंबाल बचावले. त्यांच्या मांडी व पोटारीवर बिबट्याच्या नख्यांचे तीक्ष्ण वार आहेत.

प्रवरा परिसरात बिबट्यांचे हल्ले नित्य झाले आहेत. या परिसरात बिबट्यांच्या मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. शेतात काम करताना, रस्त्याने फिरणार्‍यांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. बेलापूर, केसापूर, आंबी, अंमळनेर हा भाग बागायती पट्टा असल्याने ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांना आयते लपणे मिळत आहे. बिबटे मुख्यत्वे शेतकर्‍यांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे, कुत्री या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना भक्ष्य बनवीत आहेत. गेल्या काही दिवसांत मनुष्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने या नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवरा पंचक्रोशीतुन होत आहे.

उत्तम मेहेत्रे यांनी हल्ला झाल्यानंतर बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार घेतले. हल्ल्यातून बचावल्यानंतर काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी प्रतिक्रिया देत मेहेत्रे यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

परिसरात बिबट्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना चिंतेत टाकणार्‍या आहेत. केसापूर-बेलापूर सीमारेषेवर पवार वस्तीलगत एक पिंजरा लावला आहे. वन विभागाने परिसरात अजून दोन ते तीन पिंजरे लावावेत, अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांनी स्वतःची, कुटुंबाची व पशुधनाची काळजी घ्यावी. केसापूर ग्रामपंचायतमार्फत वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

- बाबासाहेब पवार (सरपंच केसापूर)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com