वडाळा महादेव येथे बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला परिसरात पिंजरा बसविण्याची मागणी

वडाळा महादेव येथे बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला परिसरात पिंजरा बसविण्याची मागणी

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या परिसरातील निवृत्त शिक्षक भालचंद्र कुलकर्णी यांच्या वस्तीवर रात्री दहा वाजता बिबट्याने प्रवेश करत घरासमोरील ओट्यावरून कुत्र्याचे पिल्लू ओढुन नेल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

यावेळी येथील साई कुलकर्णी या तरुणाने बिबट्यास अर्धवट स्थितीत पाहिले परंतू कुत्र्याच्या पिल्लाचा जोरात ओरडण्याचा आवाज झाल्याने कुलकर्णी यांनी प्रसंगावधान राखत घरातील आजोबा व वडील यांना घटनेची माहिती दिली. बराच वेळ परिसरात बिबट्याचा जोर जोरात गुरगुरण्याचा आवाज येत होता. यापूर्वीही येथील कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला आहे. परिसरात उसाचे मोठे क्षेत्र असून बिबट्यास लपण्यासाठी जागा असल्याने परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. तीन ते चार दिवसापूर्वी येथील शेख यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात शेख बालंबाल बचावले.

या परिसरामध्ये अनेक गोपालक असून शेजारीच छत्रपती शिवाजी विद्यालय असून येथे शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यामुळे परिसरात लवकरात लवकर पिंजरा उपलब्ध करून या बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी निवृत्त शिक्षक भालचंद्र कुलकर्णी, पप्पू कुलकर्णी, साई कुलकर्णी, प्रा. आदिनाथ जोशी, ताराचंद शिंदे, उद्धवराव पवार आदींसह पालक व नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com