बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या कुटुंबियांचे आमदार थोरातांकडून सांत्वन

बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या कुटुंबियांचे आमदार थोरातांकडून सांत्वन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

आपल्या राहत्या घरात रात्रीच्या वेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मयत झालेल्या मीराबाई रामभाऊ मेंगाळ यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांत्वन केले असून मेंगाळ कुटुंबियांना शासनाची मदत तातडीने मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

मेंगाळवाडी येथे मेंगाळ व कातोरे कुटुंबियांची आमदार थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी महिला मीराबाई रामभाऊ मेंगाळ या मयत झाल्या. तर शेजारीच असलेल्या जिजाबाई वसंत कातोरे या जखमी झाल्या आहेत. या दोन्ही कुटुंबांची आमदार थोरात यांनी भेट घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, सोमनाथ गोडसे, बाळासाहेब कानवडे, मधुकर कानवडे, लक्ष्मण मेंगाळ, गेनू मेंगाळ, बाळकृष्ण गांडाळ, संदीप गोपाळे, वन परिक्षेत्रपाल लोंढे, सौ. संगीता कोंढार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार थोरात यांनी मेंगाळ कुटुंबियांचे सांत्वन करून महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून मेंगाळ कुटुंबियांना वीस लाखांची मदत व गोपीनाथ मुंडे अपघात योजनेअंतर्गत दोन लाखांची मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांमध्ये या कुटुंबियांना मदतीचा धनादेश दिले जाईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

याप्रसंगी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सौ. जिजाबाई वसंत कातोरे यांची विचारपूसही आमदार थोरात यांनी केली असून त्यांनाही तातडीने मदत मिळवून देण्याच्या सूचना वनविभाग व प्रशासनाला केल्या आहेत. याप्रसंगी मेंगाळवाडी, सावरचोळ परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com