बिबट्याचा कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर हल्ला

कुठे घडली घटना || चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक || जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
बिबट्याचा कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर हल्ला

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा परिसरात गुरुवारी मध्यरात्री आई वडीलासमवेत कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. ऊस तोड मजूर बिबट्यामागे पळाल्यामुळे या चिमुकल्याला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यात यश आले असले तरी या चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या साखर कारखाने सुरु झाल्यामुळे आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा येथे जळगाव येथून आलेले थोरात साखर कारखान्याचे ऊस तोड मजूर अड्डा करुन राहत आहेत. गुरुवारी हे ऊस तोड मजूर आपल्या कोप्यामध्ये झोपलेले असताना मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्याने ऊस तोड मजूरांच्या कोपीत निर्धास्त झोपलेला चिमुकला विरु अजय पवार(वय 3) याला जबड्यात घेऊन शंभर ते दिडशे फुटावर पलायन केले.

त्यामुळे चिमुकला जोरात ओरडल्यामुळे आई वडीलांसह शेजारील ऊस तोड मजूरानी या बिबट्याचा थरारक पाठलाग करत त्याच्या जबड्यातून या चिमुकल्याची सुटका केली. या चिमुकल्याच्या मानेवर खोलवर जखमा झाल्यामुळे मोठा रक्तस्राव होत असल्याने त्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र चिमुकल्याची प्रकृत्ती खालवत असल्याने पहाटे 4 वा. त्याला नगर येथिल सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान मागील अनेक वर्षापासून प्रवरा नदी तिरावरील गावांमध्ये बिबट्याचा हैदोस सुरु असून शेतकर्याच्या पशुधनासह नागरीकांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. परंतू कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून केल्या जात नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची अहमदनगर जिल्ह्यातील पहिली घटना 20 वर्षापूर्वी पिप्रीं लौकी आजमपूर या भागात घडली होती. परंतू 20 वर्षानतंरही कोणतीही आश्वासक उपायोजना होत नसल्याने नागरीकांमध्ये संतापाची भावना आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com