बिबट्याच्या जबड्यातून बालिका बचावली !

अकोलेतील सुगाव नजीक थरार, माईवर रुग्णालयात उपचार
बिबट्याच्या जबड्यातून बालिका बचावली !

अकोले |प्रतिनिधी| Akole

बिबट्याच्या जबड्यातून एक दीड वर्षीय बालिका नशीब बलवत्तर म्हणून वाचल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या या बालिकेवर अकोले येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुगाव खुर्द गावापासून सुमारे अर्धा किलो मीटर अंतरावर सुखदेव भिकाजी वैद्य यांचे रस्त्यालगत घर आहे. त्यांची नात सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घराच्या ओट्यावर खेळत होती. बाजूच्या डाळिंबाच्या बागेतून अचानक आलेल्या एका बिबट्याने या बालिकेवर झडप घालून तिला जबड्यात पकडले व तिला घेऊन चालला होता. हे दृश्य पाहून तेथे असलेल्या तिच्या बहिणींनी आरडा ओरडा सुरू केला, त्याच वेळेला समोरून एक दूधवाला येत होता. मोटारसायकल च्या प्रकाशाने तसेच अचानक मोटरसायकल समोर आल्यामुळे बिबट्या डचकला व त्याने मुलीला तेथेच टाकून बाजूच्या उसात पळ काढला.

घरापासून सुमारे 100 फूट बिबट्या या मुलीला घेऊन गेला होता.सुदैवाने बाजूच्या उसात तो घुसण्या पूर्वीच समोरून मोटारसायकल वाला आल्याने ही बालिका बचावली.माई जनक वैद्य (वय दीड वर्ष) असे या बालिकेचे नाव आहे. या घटनेने प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या व जखमी झालेल्या या बलिकेच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता.तिला तातडीने अकोले येथील डॉ. भांडकोळी यांचे रुग्णालयात आणण्यात आले,तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला येथीलडॉ बुळे यांच्या रुग्णालयात दाखल करणयात आले.तिच्या गळ्या भोवती बिबट्याच्या दातामुळे गंभीर जखमा झालेल्या आहेत.एकूण 25 टाके पडले आहेत.

घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम व त्यांचे सहकारी तातडीने रुग्णालयात आले.त्यांनी वैद्यकीय अधिकारी व जखमी मुलीच्या कुटुंबीयांशी चर्चा केली व वन विभागाचे वतीने सर्व खर्च केला जाईल असे सांगितले. बाल रोग तज्ञ डॉ अमित काकड यांनीही तपासणी केली.केवळ नशीब बलवत्तर म्हणून ही बालिका बचावली.

घटनेची माहिती मिळताच आ. डॉ. किरण लहामटे यांनीही रुग्णालयात येऊन जखमी बालिकेची पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी व वन खात्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. व त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

अकोले येथून रात्री उशिरा जखमी बालिकेस लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले होते. अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. सकाळ -सायंकाळी लहान बालकांची पालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी केले आहे. सुगाव खुर्द येथे आजच तातडीने पिंजरा लावण्यात येणार असल्याचे कदम यांनी सार्वमत शी बोलतांना सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com