मांढरे पिता-पुत्रांना वारंवार बिबट्याचे दर्शन

मांढरे पिता-पुत्रांना वारंवार बिबट्याचे दर्शन

आश्वी |वार्ताहर| Ashwi

1990 साली प्रदर्शित झालेल्या ‘धडाकेबाज’ चित्रपटातील ही दोस्ती तुटायची नाय.! या अनिल मोहिले लिखित गाण्याच्या ओळी मांढरे कुटुंबातील मुलगा साई व वडील राजेंद्र मांढरे यांच्या सातत्याने नजरेस पडणार्‍या बिबट्याच्या मैत्रीसाठी तंतोतंत लागू पडाव्यात अशा असून आतापर्यंत किमान 10 ते 15 वेळेस हा बिबट्या या पिता व पुत्रास नजरेस पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील प्रवरा उजव्या कालव्यालगत नियमितपणे साई मांढरे व राजेंद्र मांढरे या पिता पुत्राला बिबट्या ये-जा करताना नजरेस पडत असतो. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला असून दोन दिवसापूर्वी रात्री 1 वाजेच्या सुमारास राजेंद्र मांढरे हे आपल्या चारचाकी वाहनातून घराच्या दिशेने चालले होते. यावेळी शिवाजी मुन्तोडे यांच्या वस्तीलगत काही हालचाल दिसली. त्यामुळे मांढरे यांनी गाडीच्या प्रकाशात पाहिले असता त्यांना शिकारीच्या शोधात बाहेर पडलेला व पुर्ण वाढ झालेला एक बिबट्या नजरेस पडला. त्यामुळे त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या बिबट्याचा व्हिडीओ चित्रीत करण्यास सुरवात केली. यावेळी निर्धास्त असलेला बिबट्या दुधडी भरुन वाहत असलेल्या उजव्या कालव्यातून शेती पाईपावरुन पलीकडे चालत गेल्याचा व्हिडीओ मांढरे यांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे.

दरम्यान बिबट्या नजरेस पडलेल्या ठिकाणापासून काही अतंरावर मोठी लोकवस्ती व वर्दळीचे ठिकाण आहे. त्यामुळे नेहमीच या परिसरात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण असते. तसेच काही दिवसापूर्वी याचं ठिकाणापासून काही अतंरावर अनेकदा लोकाच्या नजरेस हा बिबट्या पडत आहे. त्यामुळे वारंवार या बिबट्याचे दर्शन होत असल्याने हा बिबट्या वनविभागाने जेरबंद करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. तर ही दोस्ती तुटायची नाय.! या ओळी साई मांढरे व राजेंद्र मांढरे तसेच बिबट्याच्या मैत्रीला लागू पडत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.

Related Stories

No stories found.