सावकारांनी शेतकऱ्याच्या विहिरीची केली विक्री

तिघाजणांवर गुन्हा
सावकारांनी शेतकऱ्याच्या विहिरीची केली विक्री

कर्जत (प्रतिनिधी)

सावकारी कर्जाच्या व्याजापोटी एका शेतकऱ्याची विहीर जबरदस्तीने स्वतःच्या नावावर करून तिची परस्पर विक्री केल्याचा प्रकार कर्जत येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावकारांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक रामदास शिंदे, राजेंद्र महादेव कापरे (दोघेही रा. कापरेवाडी ता.कर्जत), विशाल उर्फ भाऊ जगताप (रा.सुपे ता.कर्जत) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत. या प्रकरणी नाना किसन धनवडे (रा. कापरेवाडी सध्या धायरी फाटा,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार त्यांनी सन २०१७ साली आपल्या कापरेवाडी गावाच्या शिवारातील शेततळ्यात प्लास्टिकचा कागद टाकण्यासाठी पैसे नसल्याने त्यांचा मित्र राजेंद्र कापरे याच्या मध्यस्थिने अशोक शिंदे व विशाल उर्फ भाऊ जगताप यांच्याडून १० रुपये टक्के व्याजदराने ९५ हजार व्याजाने घेतले. शेतातील उत्पन्न न निघाल्याने फिर्यादीला व्याज़ देता आले नाही तेव्हा तिघेही सावकार फिर्यादीस धमकावू लागले. त्यामुळे सन २०१८ साली फिर्यादीने कर्जत पोलिसात तक्रारी अर्ज दिला होता. मात्र यापुढे कसलाच त्रास देणार नाही व व्याजही घेणार नाही म्हणत समझोता करून हा अर्ज मागे घेण्यात आला. मात्र त्यानंतर ते अतिशय अश्लील शिवीगाळ व दमदाटी करू लागले. त्यानंतर तिघांनीही धनवडे यांच्याकडून अशोक शिंदे यांच्याकडून ३ लाख घेतले असल्याची नोटरी ४ जाने. २०१८ रोजी करून घेतली.

त्याबदल्यात त्यांनी धनवटे यांची कर्जत शिवारातील गट नं. १७५ मधील विहीर बळजबरीने नावे करून घेतली. राजेंद्र कापरे याने ती विहीर स्वतःच्या मालकीची आहे असे सांगून मधुकर रवींद्र कापरे (रा. कापरेवाडी) यास ३ लाखाला विकली व विक्री करून आलेली रक्कम तिघा संशयितांनी वाटून घेतली. धनवटे यांच्या तक्रारीनुसार कर्जत पोलिसांनी तिघांवर कलम शिवीगाळ धमकवण्यासह, महाराष्ट्र सावकारकी अधिनियम २०१४ चे कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com