श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
व्याजाने घेतलेले पैसे वेळोवेळी दिले. तसेच व्याजाच्या बदल्यात मोटारसायकल, घड्याळ, लॅपटॉप, मोबाईल गहाण ठेवला. तरीही सावकाराकडून होणार्या व्याजाच्या पैशाच्या सततच्या मागणीने त्रस्त होऊन शहरातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वॉर्ड नं 7 सरस्वती कॉलनी येथे राहणारा स्वप्नील पुरूषोत्तम तुपे (वय 33) हा मेनरोडवरील अतुल ट्रेडिंग या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. त्याने आनंद पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) नावाच्या व्यक्तीकडून 15 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात एफ झेड मोटारसायकल, एक स्मार्टवॉच, लॅपटॉप, एक वन-प्लस मोबाईल गहाण ठेवला होता. दि. 1 सप्टेंबर रोजी खासगी सावकार आनंद पाटील हा घरी आला, तो आणि स्वप्नील घराच्याबाहेर बोलत होते. तेव्हा पाटील हा स्वप्नील यास पैशांची मागणी करत होता. तेव्हा स्वप्नीलनेे त्याला मोटारसायकल विकून टाक आणि तुझे पैसे घेऊन टाक, असे सांगितले.
परंतु, मोटारसायकल मी विकत नाही, असे म्हणत पाटील याने मोटारसायकल आणून दिली आणि तूच मोटारसायकल विक आणि मला लवकर पैसे दे, नाहीतर पुढे काय होईल. बघून घे, असा दम दिला. त्यानंतर दि. 2 रोजी आनंद पाटील पुन्हा स्वप्नीलच्या घरी आला, तेव्हा स्वप्नील घरी नव्हता. त्यावेळी आनंद पाटील याने मी येऊन गेलो असे त्याला सांगा असे स्वप्नीलच्या आईस सांगितले. त्यानंतर स्वप्नील घरी आल्यावर त्याने त्याच्या आईला सांगितले की, मी सर्व पैसे दिले आहे. तरी तो मला अजून पैसे मागत आहे, त्यामुळे मला टेन्शन आले आहे. दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता त्याची आई लोकांची धुणीभांडी करण्यासाठी गेली. तेव्हा स्वप्नील एकटाच घरी झोपलेला होता. सायंकाळी 6 वाजता आई घरी आली तेव्हा स्वप्नीलने घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे पैसे दिलेले असूनसुद्धा पैशांची मागणी करुन तगादा लावल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे लता पुरूषोत्तम तुपे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आनंद पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.