
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
व्याजाच्या पैशाच्या कारणावरून राजू माकुडे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्या सावकारास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी दोषी धरून पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच मयत माकुडे यांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचा आदेश केला आहे. विलास ढवण (वय 35 रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता, सावेडी) असे शिक्षा झालेल्या सावकाराचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी वकील अनंत बा. चौधरी यांनी काम पाहिले.
विलास ढवण हा एक दिवस राजू माकुडे यांच्या घरी गेला होता. त्याने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून घरासमोरील रिक्षा घेऊन गेला. तेव्हा राजू यांना मुलगा गणेश याने विचारणा केली असता त्यांनी सांगितले,‘तीन वर्षापूर्वी मी ढवण यांच्याकडून एक लाख 10 हजार रुपये 10 टक्के व्याजाने घेतले होते. त्यापैकी एक वर्ष त्याचे व्याजासह हप्ते दिलेले आहेत. त्याचे पैसे थकल्याने तो मला पैशाची मागणी करून नेहमी शिवीगाळ, दमदाटी करतो व त्याचे राहिलेले पैसे दिले नाहीत म्हणून तो रिक्षा घेवून गेला आहे,’ असे सांगितले.
दरम्यान, ढवण याच्या त्रासाला कंटाळून 27 जानेवारी 2019 रोजी राजू माकुडे यांनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांचा मुलगा गणेश माकुडे यांनी ढवण विरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांनी केला व आरोपीविरूध्द जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.सरकार पक्षाच्यावतीने सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता वकील चौधरी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी पोलीस हवालदार प्रबोध अण्णासाहेब हंचे यांनी सहकार्य केले.