भाववाढीमुळे लिंबू सरबत झाले दुर्मिळ

रसवंतीगृह व ज्यूस सेंटर मधून लिंबू झाले गायब
भाववाढीमुळे लिंबू सरबत झाले दुर्मिळ

चासनळी |वार्ताहर| Chasnali

कडक उन्हाळ्यात शरीरास लिंबू आरोग्यवर्धक असल्यामुळे येणार्‍या पाहुण्यांना दुपारच्या वेळी दिले जाणारे लिंबू सरबत लिंबाच्या भावामुळे सर्वसामान्यांना दुर्मिळ झाले असून पाहुण्यांना काय पाहुणचार करावा, असा प्रश्न ग्रामीण भागात पडला आहे.

एरव्ही 2 - 3 रुपायाला मिळणारे लिंबू दहा रुपयाला झाल्यामुळे सर्वसामान्यांना घेण्यास परवडत नाही. 150 ते 200 रुपये किलोपर्यंत भाव गेल्यामुळे लिंबू सरबत पिणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शरीरातील उष्णता कमी करून ऊर्जा मिळण्यासाठी लिंबू सरबतचा वापर सर्रास केला जातो. हॉटेल आणि रसवंतीगृहातही त्याचा सर्रास वापर होतो. मात्र लिंबाचे दर गगनाला भिडल्यामुळे हॉटेल आणि रसवंतीगृहातूनही लिंबू गायब झाले आहे. लिंबाचे भाव वाढल्यामुळे शेतकरी जरी आनंदित असला लहरी हवामानामुळे लिंबाच्या झाडाला फळे कमी आली आहे. त्यामुळे बाजारात आवकही कमी आहे. त्यामुळे लिंबाचे दर कडाडले आहेत. सर्वसामान्यांच्या जेवणाच्या ताटात दिले जाणारे लिंबू आता ग्रामीण भागातही गायब झाले आहे.

मध्यंतरी वातावरण खराब झाल्यामुळे लिंबाच्या झाडाला लिंबू कमी प्रमाणात लागली. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. एरव्ही शेतकर्‍यांना दहा रुपयाला दहा लिंबू विकण्याची वेळ येते. मात्र आता सफरचंदाच्या भावात लिंबू भाव खात असल्यामुळे उन्हाळ्यात उसाचा रस, अननस, चिक्कू, आंबा यापासून तयार होणारे ज्यूस घेण्यावर लोकांचा भर दिसत आहे. त्यात अंधश्रद्धा असो वा भावना कितीही सुशिक्षित असो किंवा अडाणी आपल्या घराला अथवा गाडीला कुणाची नजर लागू नये म्हणून लिंबू आणि मिरची एकत्र करुन लोक बांधतात मात्र लिंबाबरोबरच मिरचीचे भाव गगनाला भिडले असून व्यवसाय करणार्‍यांनी देखील त्याचे भाव दुपटी तिपटीने वाढविले आहे. एकूणच लिंबामुळे उन्हाळ्यात मिळणारा गारवा मात्र सर्वसामान्यांना दुरापास्त झाला आहे

भाववाढीमुळे लिंबाचे सरबत सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचवत आहे. त्यामुळे चिक्कू, आंबा यापासून तयार होणार्‍या ज्यूसला मोठी मागणी आहे. एक ग्लास सरबतासाठी एक लिंबू लागत असल्यामुळे वीस रुपये ग्लास देण्यास ग्राहक टाळाटाळ करतात. त्यामुळे लिंबू सरबता ऐवजी कमी किमतीत तयार होणारे इतर फळांच्या ज्यूसला ग्राहकांची पसंती आहे.

- नितीन तुंबारे, रसवंती व ज्युस सेंटर चालक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com