घुलेंची पक्षाकडे तर कोल्हेंची स्थितीवर नजर

विधान परिषद निवडणूक : ‘फराळ पे चर्चे’चा जोर वाढला
घुलेंची पक्षाकडे तर कोल्हेंची स्थितीवर नजर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजप नेेते शिवाजी कर्डिले यांनी विधान परिषदेसाठी ‘प्रेशर पॉलिटिक्स’ सुरू करताच निवडणुकीची चर्चा तापली आहे. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर घुले यांच्याकडूनही दिवाळीचा फराळ जिल्ह्यातील अनेकांकडे पोहचला. हा कौटुंबिक जिव्ह्याळ्याचा भाग असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात असला तरी त्यांची नजर विधान परिषदेवर असल्याची चर्चा वाढीस लागली आहे. दरम्यान, उत्तरेतील मातब्बर नेत्या माजी आ.स्नेहलता कोल्हे या राजकीय स्थितीवर नजर ठेवून असल्याचे वृत्त समोर आल्याने निवडणूक ज्वर अधिकच वाढला आहे.

विधान परिषदेसाठी अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक डिसेंबर अखेरीस होत आहे. या निवडणुकीसाठी या आठवड्यात पडद्याआड अनेक राजकीय घाडामोडी सुरू झाल्या आहेत. आ.अरुणकाका जगताप 10 वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. यावेळी त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, यापासून चर्चेला सुरूवात झाली. या चर्चेला जिल्हा बँक निवडणुकीत पडद्याआड घडलेल्या घडामोडींची किनार आहे. उमेदवारी कोण करणार, हा प्रश्न चर्चेत असताना माजी मंत्री कर्डिले यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे मनसुबे स्पष्ट करताच चर्चेचा रोखही बदलला आहे. त्यांनी एकाचवेळी पक्ष आणि संभाव्य स्पर्धकांवर दबाव वाढविण्यासाठी डाव टाकण्यास सुरूवात केल्याचे मानले जाते.

कर्डिलेंचे मिठाई बॉक्स चर्चेत असताना घुले कुटुंबाने जिल्ह्यात पाठविलेला फराळही चर्चेत आला आहे. स्वत: घुले यांनी उमेदवारीबाबत जाहीर वक्तव्य टाळले आहे. मात्र त्यांची यंत्रणा महिनाभरापासून या निवडणुकीची तयारी करत असल्याचा दावा अनेकांनी खासगीत बोलताना केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विधान परिषदेतील संभाव्य मतदारांशी संपर्क मजबूत करण्यावर भर दिला होता. घुले यांनी जिल्हा बँक निवडणुकीत घेतलेला पुढाकार, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांशी साधलेली जवळीक आणि पक्ष म्हणून स्वीकारलेल्या जबाबदार्‍या या विधान परिषद डोळ्यासमोर ठेवून होत्या, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची त्यांना प्रतीक्षा आहे.

दुसरीकडे कर्डिलेंनी भाजपवर उमेदवारीबाबत अप्रत्यक्ष दबाव निर्माण केला असला तरी पक्षातील अन्य इच्छुकांनी पडद्याआड डाव टाकले आहेत. कोपरगावच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव प्रामुख्याने समोर येत आहे. त्यांच्या समर्थकांनी सुरू केलेल्या हालचाली विधान परिषदेच्या तयारीचे संकेत देत आहेत. महिनाभरात राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांशी कोल्हे यांची झालेली चर्चा ही याचनिमित्ताने होती, असा दावा केला जात आहे. पक्ष म्हणून भाजपचे काही बेरजेचे राजकारण आहे, त्याची पूर्ती करण्याचे धाडस कोल्हेंकडे आहे, याकडे काहींनी आवर्जून लक्ष वेधले.

विधान परिषदेत महिलांचे प्रतिनिधीत्व अत्यल्प आहे. त्यामुळे कोल्हेंच्या निमित्ताने महिला नेत्याला संधीची अपेक्षाही समर्थकांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कोल्हेंशी संपर्क साधणारे नेते विविध पक्षातील असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. एकीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्याकडे चाचपणी केली जात असताना महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनीही कोल्हे कुटुंबाकडून राजकीय स्थितीचा आढावा घेतला आहे. कर्डिले यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना पाठविलेल्या दिवाळीच्या मिठाईची चर्चा झडताच, कोल्हेंनी तर हजारावर फराळाचे बॉक्स आधीच रवाना केले होते. त्याचीही चर्चा करायची का, असा सवाल एका भाजप नेत्याने खासगीत बोलताना केला. एकूणच विधान परिषदेच्या निमित्ताने राजकीय स्थिती रंगतदार झाली आहे.

विखे-कर्डिले मेतकूट जमणार ?

अलिकडे खा.डॉ.सुजय विखे यांनी शिवाजी कर्डिले आमदार होणार, असे भाकीत केले होते. त्यानंतर कर्डिलेंच्या नावाची चर्चा वाढली. विधान परिषदेच्या निमित्ताने विखे गटालाही अस्तीत्व दाखविण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा बँकेत अलिकडच्या काळात कर्डिले यांनी विखेंच्या मदतीसाठी लढवलेली खिंड राजकीय गप्पांचा विषय झाली आहे. विखे-कर्डिले यांनी विधानसभा निवडणुकीनंतर वाढलेल्या मतभेदांवर मात केल्याचे म्हटले जाते. यात किती तथ्य आहे, हे देखिल कर्डिलेंनी उमेदवारी केल्यास स्पष्ट होणार आहे. मात्र कोल्हेंचे नाव समोर आल्यास या नेत्यांची कोंडी वाढणार आहे.

कोल्हेंची भुमिका गुलदस्त्यात

विधान परिषद निवडणुकीबाबत भाजप नेत्या स्नेहलता कोल्हेंकडून अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत नाहीत. नगर जिल्ह्यासह वैजापूर, येवला, सिन्नर या शेजारच्या मतदारसंघात साखर कारखानदारीच्या निमित्ताने कोल्हे कुटुंबाचा वावर आहे. त्यांना बळ दिल्यास पक्षाचाच फायदा होणार आहे, असे राजकीय गणित त्यांच्या समर्थकांनी पक्षश्रेष्ठींच्या कानी घातले आहे. पक्षातील ‘एककल्ली’ राजकारणाला शह देण्यासाठी कोल्हेंची मदत होईल, असे मानणारा एक गट सक्रीय झाला आहे. राजकीय वर्चस्वाला आहोटी लागलेले ‘नेते’ कोल्हेंना विरोध करण्याचा धोका पत्करतील का, असा थेट सवाल एकाने केला. विरोध केल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत होणार्‍या ‘अडचणी’चा संदर्भ त्याने दिल्याने एकूणच राजकारण गुंतागुंतीचे होणार असे संकेत आहेत.

घुलेंचे आस्तेकदम

विधान परिषद निवडणूक या विषयावर अधिक बोलणे चंद्रशेखर घुले यांनी टाळले. विधान परिषद उमेदवारीबाबत काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. ‘पक्ष ज्या नेत्याला उमेदवारी देईल, त्याचे काम पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून करणार आहे. पक्षाच्या भल्यासाठी पक्षश्रेष्ठींचा जो आदेश असेल, तो आपण मान्य करतो.’ अशी त्रोटक प्रतिक्रीया त्यांनी ‘सार्वमत’शी बोलताना दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com