
अहमदनगर | प्रतिनिधी
नगरसह (ahmednagar) राज्यातील विधान परिषदेसाठी (Legislative Assembly) १२ नोव्हेंबरपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू होईल, असे सुतोवाच पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी केले आहेत. त्यामुळे दिवाळी संपताच विधान परिषदेच्या निवडणूक राजकारणाला वेग येणार आहे.
डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद सदस्यांची निवड १ जानेवारीआधी करावी लागणार आहे. कोविड संकटामुळे या निवडणुकीत काही अडथळे येणार का, अशी चर्चा होती. मात्र पालकमंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे आचारसंहितेचा उल्लेख केला. सोबतच १२ नोव्हेंबरपासून प्रक्रीया सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य सरकार व निवडणूक आयोगाकडून तयारी झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
नगर जिल्हा प्रशासनाने ३९६ मतदार निवडणुकीसाठी पात्र असल्याची माहिती निवडणूक आयोगाला सादर केली आहे. मात्र जिल्ह्यातील निवडणूक तोंडावर असलेल्या नगर पालिकांमुळे विधान परिषदेवर काही परिणाम होणार का, हा संभ्रम अद्याप दूर झालेला नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर विधान परिषद मतदारसंघाचे प्रतिधित्व सध्या राष्ट्रवादीचे अरूणकाका जगताप करतात. ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. या जागेवर राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार, याची चर्चा अद्याप सुरू आहे. तर भाजपकडूनही आता काही नावे समोर येत आहेत.