एलईडीप्रकरणी मनपा अधिकारी, ठेकेदारांची खरडपट्टी

सभापती अविनाश घुले यांनी घेतला आढावा
एलईडीप्रकरणी मनपा अधिकारी, ठेकेदारांची खरडपट्टी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात 25 हजार एलईडी दिवे बसविण्याचा ठेका दिला. मात्र अजूनही शहरात सर्वत्र लाईट बसल्या गेल्या नाहीत. यासंदर्भात स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी गुरूवारी संबंधित ठेकेदार आणि महापालिका अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत काम अपूर्ण असल्याबद्दल अधिकारी आणि ठेकेदार यांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली.

बैठकीला विरोधीपक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, माजी नगरसेवक निखिल वारे, संजय चोपडा, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त राऊत, विद्युत विभाग प्रमुख वैभव जोशी बैठकीला उपस्थित होते. ठेकेदार एजन्सीचे सोमवंशी यांनी बैठकीत दिलेल्या माहितीचे समाधान न झाल्याने बारस्कर आणि वारे यांनी अधिकार्‍यांवर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले. एलईडी ठेका घेण्यापूर्वी दिलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये 60 वॅटचे दिवे लावून दाखविले. त्याचा लख्ख प्रकाश पडल्याने ठेका दिला. प्रत्यक्षात मात्र 30 वॅटचे दिवे लावले जात आहेत.

ही नगरकरांची फसवणूक असून यासंदर्भात महासभा घ्यावी. त्यात निर्णय घ्यावा, अशी सूचना बारस्कर यांनी केली. वारे यांनी सरसकट 60 वॅटचे दिवे लावावेत. जुने काढलेले चालू फिटिंग ज्याठिकाणी बंद आहेत, तेथे तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात याव्यात, अशी सूचना केली. डॉ. बोरुडे यांनी शहरात पथदिवे बंद असल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत तात्काळ एलईडी बसण्यास सुरुवात करावी, अशी सूचना केली. आयुक्त बैठकीला उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा बैठक आयोजित केली जाईल. त्यात तांत्रिक बदल करून ठेकेदाराला जास्त वॅटचे दिवे लावण्याची सूचना केली जाईल असे सांगत सभापती घुले यांनी शहराच्या भल्यासाठी चांगले निर्णय घेतले जातील असे सांगितले.

28 ऑक्टोबरला एलईडी दिवे बसविण्यास सुरुवात करण्यात आली. 20 दिवसांत ठेकेदाराने 250 एलईडी दिवे बसविले. मात्र त्याचा उजेड पडत नसल्याच्या तक्रारी आल्याने स्थायी समितीच्या सभेत जास्त वॅटचे दिवे लावण्याचा निर्णय झाला. प्रशासनाने त्यावर काहीच कारवाई न केल्याने सभापती घुले यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला. शहरात बसविण्यात येणार्‍या एलईडी दिवे यासंदर्भात दैनंदिन नियोजन काय? यासंदर्भातील माहिती तयार करून बैठकीला येण्याचे आदेश सभापती घुले यांनी ठेकेदाराला दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com