श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

इंजिनिअरिंगसाठी भारतातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणार्या आय.आय.टी. च्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या

जेईई अॅडव्हान्स- 2020 या परीक्षेमध्ये श्रीरामपूरच्या चिरंजीव तन्मय मारुती वाघ या विद्यार्थ्याने संपूर्ण भारतात इतर मागास प्रवर्गातून 2224 वी व जनरल मधून 11254 वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे त्याचा आय. आय.टी. मधील प्रवेशही निश्चित झाला आहे.संपूर्ण भारतात 23 वेगवेगळ्या आयआयटी संस्थानांमध्ये अंदाजे 16000 जागा उपलब्ध असल्यामुळे तन्मयचा प्रवेश निश्चितच आहे.

करोनाच्या जागतिक संकटामुळे यावर्षी आय.आय.टी. प्रवेशासाठीची जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा थोड्याशा उशीराने अर्थातच सप्टेंबरमध्ये घेण्यात आली. संपूर्ण भारतातून बारा लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातून श्रीरामपूरसारख्या तालुकास्तरातून तन्मय मारुती वाघ या विद्यार्थ्याने ओबीसी प्रवर्गातून 2224 वी रँक मिळवून विशेष यश संपादन केले. सर्वात महत्वाचे म्हणजे आयआयटीच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी कोटा राजस्थान येथे जात असतात, परंतु तन्मयने मात्र श्रीरामपुरात राहूनच, श्रीरामपूरातील प्रतिष्ठित पेंटॅगॉन करियर इंस्टिट्यूट मध्ये कोचिंग घेऊन हे यश संपादन केलेले आहे. श्रीरामपूर तालुक्यात ही परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांमध्ये तन्मयने सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रीरामपुरात कोचिंग घेऊन असे यश संपादन करून आयआयटीत प्रवेश मिळविणारा तन्मय वाघ हा पहिलाच विद्यार्थी असेल. लाखो रुपये खर्च न करताही तसेच कोटा व ईतरत्र बाहेरगावी कुठेही क्लाससाठी न जाताही आयआयटी मध्ये यश संपादन करता येते हे तन्मय ने दाखवून दिले त्यामुळे त्याचे हे यश विशेष उल्लेखनीय आहे. विशेष गोष्ट म्हणजे तन्मयने आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केलेले आहे.

चि. तन्मय हा प्राथमिक शिक्षक श्री मारुती वाघ व प्रतिभाताई वाघ यांचा सुपुत्र असून, आई-वडिलांचे व बहिणीचे प्रोत्साहन मला या यशापर्यंत घेऊन आले हे तो नमूद करतो. तसेच पेंटागॉन करियर इंस्टिट्यूट श्रीरामपूरचे प्रा. प्रमोद निर्मळ, प्रा. तोफिक शेख प्रा. सुजित वाकचौरे व प्रा. मंगेश रसाळ यांच्या मार्गदर्शनाचा माझ्या यशात सिंहाचा वाटा असल्याचे सांगतो.