चळवळीच्या जिल्ह्यात आता लाचारांची फौज

शेतकर्‍यांकडे केंद्र-राज्य सरकारचे दुर्लक्ष - राजू शेट्टी
चळवळीच्या जिल्ह्यात आता लाचारांची फौज

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीमागे कोणताही पक्ष नाही. त्यामुळे आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे ना केंद्र सरकारने, ना राज्य सरकारने लक्ष दिले. त्यामुळे शेतकरी एकटा पडला आहे. नगर जिल्हा क्रांतिकारी चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. आता मात्र या जिल्ह्यात लाचारांची फौज तयार झाली असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

शेवगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालय येथे मंगळवारी शेतकरी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास वस्त्राद्योग महामंडळाचे माजी सदस्य रविकांत तुपकर, स्वाभिमानीचे प्रकाश बालवडकर, अमरसिंह कदम, अंबादास कोरडे, माजी सभापती दिलीप लांडे, रावसाहेब लवांडे, सुनिल लोंढे, शरद मरकड, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगडे, दत्ता फुंदे, स्नेहल फुंदे, प्रविण म्हस्के, भाऊ बैरागी, बाप्पूसाहेब राशीनकर, संदीप बामदळे, संजय नांगरे, सुनील काकडे, अशोक भोसले, संदीप मोटकर, दादा टाकळकर आदी उपस्थित होते.

शेट्टी पुढे म्हणाले, अतिवृष्टी झाली, महापूरात शेती वाहून गेली. मात्र पालकमंत्री इकडे आले नसतील कारण ते आमच्याकडचे आहेत. त्यामुळे ते कसे आहेत, हे मला चांगले माहीत आहे, असे सांगत पालकमंत्री हसन मुश्रीफांवर तोफ डागली. एक रक्कमी एफआरपी शेतकर्‍यांना वरदान ठरते. मात्र, सरकारने त्याचे तीन तुकडे केले आहेत. एफआरपीचे तीन तुकडे कारखानदारांची सोय आहे. विमा कंपन्या सरकारी अधिकार्‍यांना हाताशी धरुन पिकं कापणी अहवाल सादर करित आहेत.

त्यामुळे विमा कंपन्या आज नफ्यात आहेत. अतिवृष्टी, महापूर आल्यानंतर पिकांचे काय होते हे सांगण्याची गरज नाही. नैसर्गिक आपत्तीनंतर पूरग्रस्तांना केंद्र व राज्य सरकारने आदेश देऊन 25 टक्के तातडीने विम्याचा हप्ता द्यायला हवा होता. वास्तविक विमा कंपन्या सरकारचे ऐकायला तयार नाहीत. शेतकर्‍यांवर अस्मानी नाही तर सुलतानी संकट आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीनचे दर कोसळल्याचे शेट्टी यांनी सांगितले. मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांचा ऊस पेटवून द्या

गेल्या वर्षीचा पूर्ण हिशोब ज्या कारखान्याने अद्यापही केला नाही, असे कारखाने बंद पाडा तरच शेतकर्‍यांना न्याय मिळेल. प्रत्येक गावात ऊस तोडणीचे वरचे पैसे द्यायचे नाहीत, असा ठराव करा. जे देतील त्यांचा ऊस पेटवून द्यायचा ठराव करा. आता रडत बसायची वेळ नाही तर लढायची वेळ आहे, असे शेट्टी म्हणाले.

एकी दिसली तरच भाव

शेतकर्‍यांमध्ये एकी दिसली तरच उसाला भाव मिळेल. शेवगाव तालुका हा लढवय्यांचा तालुका आहे, असे सांगताना शेतकरी आंदोलनावेळी घोटण येथे झालेल्या गोळीबाराचा दाखला रविकांत तुपकर यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com