एलसीबीची गुटखा विक्रेत्यांवर छापेमारी

10 लाखांचा मुद्देमाल जप्त; 11 जणांविरोधात गुन्हे
एलसीबीची गुटखा विक्रेत्यांवर छापेमारी
गुटखा

अहमदनगर (प्रतिनिधी)

शहरसह जिल्ह्यात खुलेआम विक्री सुरू असलेल्या पानमसाला, सुगंधी तंबाखू, मावा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून 10 लाख नऊ हजार 870 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आठ ठिकाणी केलेल्या कारवाईत 11 जणांविरोधात कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी व शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नगर शहरासह जिल्ह्यात अवैध गुटखा, मावा विक्री सर्रास सुरू आहे. कच्चा सुपारीचा वापर करून मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मावा तयार केला जातो. नगर शहरासह जिल्ह्यातील टपर्‍यावर याची खुलेआम विक्री केली जाते. तसेच पानमसाला, गुटखा याचीही या टपर्‍यांमधून सर्रास विक्री सुरू आहे. यावर कारवाई करण्याचे अधिकार अन्न प्रशासन व पोलिसांना आहे. परंतु, अन्न प्रशासनाकडून या विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. तर स्थानिक पोलिसांचे या विक्रेत्यांना पाठबळ असते. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मावा, गुटखा विक्री होत आहे. याठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची वेगवेगळे पथके स्थापन करण्यात आली. या पथकाने 21 ते 26 ऑगस्ट दरम्यान 11 ठिकाणी छापेमारी केली. या छाप्यात गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, कच्ची सुपारी, तयार मावा, चूना, मावा तयार करणारे मशीन असा 10 लाख नऊ हजार 870 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

‘या’ विक्रेत्यांवर गुन्हे

समीर मेहमूद सय्यद (रा. नेप्ती ता. नगर), विजय विष्णू सब्बन (रा. दातरंगे मळा, नगर), राजू नारायण सब्बन (रा. तोफखाना, नगर), रियाज रहीमबक्श तांबोळी (रा. पारशाखुंट, नगर), राजू रामराव वराट (रा. निंबळक ता. नगर), अमोल नानासाहेब काळे (रा. रेणूकानगर, बोल्हेगाव), राजेंद्र पंढरीनाथ शिंदे, लतीफ बाबा शेख, रम्मू बाबा शेख, जमीर रशीद शेख (सर्व रा. बोधेगाव ता. शेवगाव), रमजान मन्सून पठाण (रा. काटवन खंडोबा, नगर) यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 328, 188, 272, 273 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com