विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची ऑनलाईन नोंदणी होणे आवश्यक - पालकमंत्री हसन मुश्रीफ

बांधकाम कामगारांकरिता मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची ऑनलाईन नोंदणी होणे आवश्यक - पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर |Ahmednagar

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्गत राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जास्तीत जास्त कामगारांची त्या त्या आस्थापनेने ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असुन शासनाच्या कामगार कल्याणकारी मंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनाचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कामगार विभागातर्गत बांधकाम कामगारांकरिता मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते विनायक नगर रोड येथील स्काय ब्रीज भोसले आखाडा येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार तथा शिर्डी संस्थांचे नवनियुक्त अध्यक्ष आशुतोष काळे, आमदार निलेश लंके, उपमहापौर गणेश भोसले, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चू. श्रीरंगम, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, क्रेडाईचे अध्यक्ष अमित मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, राज्यात ११ कोटी लोकसंख्या असुन त्यापैकी ५ कोटी कामगार आहेत. यात ४ कोटी ६० लाख असंघटित कामगार असुन फक्त ४० लाख संघटित कामगार आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी नव्याने मंडळ स्थापन करत आहे. यामध्ये ऊसतोड कामगारांचे मंडळ स्थापन केले असुन ड्राइवर, रिक्षाचालक, ट्रॅकचालक, शेतमजूर, हॉटेल कामगार यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ सुरु करणार आहे.

या सर्व कामकाजसाठी राज्य शासनाचा कामगार विभाग काम पाहत आहे. आज मध्यान्ह भोजन शुभारंभप्रसंगी ५ कोटी कामगारांना आश्वासित करतो की, कामगार विभागामार्फत सुरु असलेल्या विविध योजनेचा लाभ मिळेल व त्यांना दोन वेळेचे जेवण यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी असंघटित कामगारांनी कामगार कल्याण मंडळाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करून घेणे असे आवाहन त्यांनी केले.

राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते ५ प्रतिनिधिक बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्डचे (ओळखपत्र) वाटप करण्यात आले. तसेच विविध कल्याणकारी योजनेतर्गत लाभ मिळालेल्या बांधकाम कामगारांना विविध योजनेच्या अंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले. यामध्ये नैसर्गिक मृत्यूमुळे मयत झालेल्या कामगारांच्या वारसाला २ लाख रुपये, अभियांत्रिकी इंजिनीररिंग पदवीसाठी ६० हजार, पदवीकेसाठी २० हजार शिक्षण, पदवी शिक्षणासाठी २० हजार आणि नैसर्गिक प्रसृतीसाठी १५ हजार अर्थसाहाय म्हणुन एकुण ५ व्यक्तींना धनादेशाचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

मध्यान्ह पालक मंत्र्यांच्या हस्ते मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चू. श्रीरंगम यांनी केले. क्रेडाईचे अध्यक्ष अमित मुथा यांनी मनोगत व्यक्त केले. कामगार उपायुक्त नाशिक विभाग वि. ना. माळी यांनी आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com