
राहाता (वार्ताहर)
येथील लोखंडी मळ्यात शनिवारी रात्री ३ बिबट्यांनी ३ कुत्र्यांचा फडशा करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
विरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, गणेश बोरकर, संतोष बोरकर हे तिघेजण शनिवारी रात्री २.३० वाजेदरम्यान राहाता रांजणगाव रोड वरून लोखंडीच्या मळ्याजवळून चारचाकी वाहनातून जात असताना त्यांना राहाता सोसायटीचे नूतन सदस्य स्वप्निल गाडेकर यांच्या सर्वे नंबर २८१ मधील शेतात ३ बिबटे रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे बसलेले दिसले. अचानकपणे या तिघांना ३ बिबट्याचे दर्शन झाल्याने काही काळ त्यांच्या मनात भीती निर्माण झाली.
या तिघांचे स्वप्नील गाडेकर हे मित्र असल्यामुळे त्यांनी लगेचच आपली चारचाकी गाडी स्वप्निल गाडेकर यांच्या वस्तीकडे नेऊन त्यांना झोपेतून उठून त्यांच्या शेतात असलेल्या ३ बिबट्यांविषयी माहिती दिली. ज्याठिकाणी ३ बिबटे बसलेले होते त्या ठिकाणी गाडी घेऊन गेले असता तीन बिबटे जवळ जवळ अंतरावर निश्चितपणे बसलेले दिसले. गाडीच्या बल्बचा प्रकाश टाकत हॉर्न वाजवण्याचा प्रयत्न केला. परंतु या बिबट्यांवर लाईट व हॉर्न आवाजाचा कुठलाही परिणाम जाणवला नाही. एक तास या चौघांनी गाडीमध्ये बसून निवांत बसलेल्या ३ बिबट्यांना मनसोक्त बघण्याचा आनंद घेतला.
गाडी काही अंतरावर शेतामध्ये उभी केली. जवळपास १ तास गाडीच्या लाईटच्या प्रकाशात या बिबट्यांचा संचार बघत बिबट्यांचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपले. सर्व बिबटे बिनधास्तपणे का बसलेले असतील या मागचे कारण वेगळेच होते. या बिबट्यांनी या परिसरात असलेल्या ३ कुत्र्यांचा फडशा पाडत त्यांच्यावर ताव मारला होता. त्यांची भूक भागली असल्यामुळे ते एका जागी बसून होते. हे रविवारी सकाळी स्वप्निल गाडेकर यांना समजले. रविवारी सकाळी गाडेकर यांनी त्यांच्या शेतात बसलेल्या ३ बिबट्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. अनेक नागरिक पहाटे या ठिकाणी मॉर्निंग वॉक करिता रस्त्यावरून ये-जा करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ चारी येथील सोनवणे फॉर्म या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. या परिसरातील अनेक शेळ्या तसेच कुत्र्यांची बिबट्याने शिकार केली आहे. वन विभागाला अनेकदा सूचना करूनही वन अधिकारी पिंजरा लावण्यास टाळाटाळ करतात. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे बिबट्याचा मोठ्या प्रमाणात संचार दिवसेंदिवस वाढत चालला असून वन विभागाने तात्काळ पिंजरे लावून त्यांना जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.